amit deshmukh vaishali deshmukh elected unopposed to vilas sugar factory | Sarkarnama

महाआघाडीचा चमत्कार : वैशालीताईंसह अमित देशमुख  बिनविरोध 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 डिसेंबर 2019

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणाचा पहिला फायदा निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत कॉंग्रेसला झाला. कॉंग्रेस व देशमुख परिवाराचे वर्चस्व असलेल्या या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक थोडाही विरोध न घेता बिनविरोध काढण्यात आमदार अमित देशमुख यांना यश आले आहे. यातूनच कारखान्याच्या संचालकपदी विद्यमान अध्यक्षा वैशालीताई देशमुख यांच्यासह आमदार देशमुख बिनविरोध निवडून आले आहेत.

लातूर  : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणाचा पहिला फायदा निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत कॉंग्रेसला झाला. कॉंग्रेस व देशमुख परिवाराचे वर्चस्व असलेल्या या कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक थोडाही विरोध न घेता बिनविरोध काढण्यात आमदार अमित देशमुख यांना यश आले आहे. यातूनच कारखान्याच्या संचालकपदी विद्यमान अध्यक्षा वैशालीताई देशमुख यांच्यासह आमदार देशमुख बिनविरोध निवडून आले आहेत.

त्याची अधिकृत घोषणा बाकी असून आमदार देशमुख (भैया) यांनी त्यांचा बाभळगाव गटातील अर्ज मागे घेतल्यानंतर कारखान्याच्या सर्व 21 संचालकांची बिनविरोध निवड होणार आहे. 

कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार 21 जागांसाठी 27 जणांनी अर्ज दाखल केले होते. विरोधी पक्षांनी यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी उत्साह दाखवला नाही. यात पाच जणांचे अर्ज सोमवारी (ता. 23) झालेल्या छाननीत बाद झाले. यात निवळी गटातून राहुल देशमुख, शिराळा गटातून मनोज पाटील, राहुल देशमुख, चिंचोलीराववाडी गटातून ज्ञानोबा खुणे, तर अनुसूचित जाती व जमाती गटातून बलभीम भोसले यांचा समावेश आहे.

छाननीनंतर 21 जागांसाठी 22 अर्ज उरले. यात बाभळगाव ऊसउत्पादक गटात तीन जागांसाठी चार अर्ज उरले. उत्पादक सहकारी संस्था गटातून आमदार देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे. 

बाभळगाव गटातही त्यांचा अर्ज वैध ठरला असून त्यांनी माघार घेतल्यानंतर या गटातील युवराज मोहनराव जाधव, अमृत हरिश्‍चंद्र जाधव व ज्ञानोबा रामराव शेंडगे या उमेदवारांची बिनविरोध निवड होऊ शकते. अर्ज मागे घेण्याची मुदत आठ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असल्याने त्यानंतरच सर्व संचालकांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा होऊ शकते. सध्या तरी थोडेही कष्ट न घेता कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध काढण्यात आमदार देशमुख यशस्वी झाले आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख