मेडिकल कॉलेजच्या शंभर जागा परत मिळवून द्या : अमित देशमुख 

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शंभर जागांचा फटका बसल्याप्रकरणी आमदार अमित देशमुख यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थितीत करून शासनाचे लक्ष वेधले आहे. या शंभर जागा परत मिळवण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.
मेडिकल कॉलेजच्या शंभर जागा परत मिळवून द्या : अमित देशमुख 

लातूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शंभर जागांचा फटका बसल्याप्रकरणी आमदार अमित देशमुख यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थितीत करून शासनाचे लक्ष वेधले आहे. या शंभर जागा परत मिळवण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.

येथील मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने काही महिन्यांपूर्वी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तपासणी केली होती. वसतिगृह व लेक्‍चर हॉलची त्रुटी काढून 50 जागा रद्द केल्या होत्या; तसेच नवीन 50 जागातही या महाविद्यालयाला डावलले होते. म्हणजे या महाविद्यालयाला शंभर जागांचा फटका बसला आहे. याची आमदार अमित देशमुख यांनी दखल घेतली. त्यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थितीत करून शासनाचे लक्ष वेधले आहे.

राज्य शासनाने लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्याने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने महाविद्यालयाच्या सध्याच्या प्रवेश क्षमतेच्या म्हणजे 150 पैकी 50 जागा कमी केल्या आहेत. त्याचप्रमाणे या वर्षीपासून वाढवून देण्यात येणाऱ्या आणखी 50 जागा अशा एकूण 100 जागा कमी होणार आहेत. महाविद्यालयातील त्रुटींची पूर्तता न झाल्याने या जागांना मुकावे लागणार आहे. आता सध्या सुरू असलेली प्रवेशप्रक्रिया ही केवळ शंभर जागांसाठीच राबविली जात आहे.

यावर्षी राज्याला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी 970 जागा वाढवून मिळाल्या होत्या. यापैकी 50 जागा लातूर वैद्यकीय महाविद्यालयाला वाढवून मिळाल्या असत्या; मात्र शासनाच्या हलगर्जीपणामुळे या शैक्षणिक वर्षात लातूरला वैद्यकीय महाविद्यालयास शंभर जागांचा फटका बसला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या महाविद्यालयाला लेक्‍चर हॉल आणि वसतिगृहासाठी तातडीने निधी देण्यात यावा; तसेच मेडिकल कौन्सिलने रद्द केलेल्या जागा पुन्हा मिळवून देण्यात याव्यात, अशी मागणीही आमदार देशमुख यांनी सभागृहात केली. शासन यात काय प्रयत्न करते याकडे आता लक्ष लागले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com