amil shah's public meeting in Nagpur | Sarkarnama

अमित शहांच्या नागपुरातील पहिल्या जाहीरसभेसाठी आमदारांना गर्दीचे `टार्गेट' 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 1 जानेवारी 2019

येत्या 20 जानेवारीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नागपुरातील पहिल्यावहिल्या जाहीरसभा यशस्वी व्हावी, यासाठी भाजपचे नेते झटत असून विदर्भातील भाजप आमदारांना गर्दी जमविण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. 

नागपूर : येत्या 20 जानेवारीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नागपुरातील पहिल्यावहिल्या जाहीरसभा यशस्वी व्हावी, यासाठी भाजपचे नेते झटत असून विदर्भातील भाजप आमदारांना गर्दी जमविण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. 

येत्या 19 व 20 जानेवारीला नागपुरात भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीच्या समारोपाला भाजपचे अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर अमित शहा यांची नागपुरात जाहीरसभा आयोजित केली आहे. नागपुरातील सर्वात मोठे मैदान असलेल्या कस्तुरचंद पार्कवर ही जाहीरसभा होणार आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शहा यांची नागपुरातील ही पहिलीच जाहीरसभा आहे. या मैदानावरील जाहीरसभेला किमान 1 लाखावर लोक जमा झाले पाहिजे, अशी भाजपच्या वरिष्ठांची इच्छा आहे. 

ही जाहीरसभा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र भाजपचे नेतेमंडळी कामाला लागली आहे. भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात बैठक झाली. 
या बैठकीला विदर्भातील भाजपचे सर्व आमदार व खासदार उपस्थित होते. खासदार रामदास तडस, खासदार अशोक नेते, खासदार हंसराज अहीर यांच्यासह आमदार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रामदास आंबटकर, आमदार अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे आदी उपस्थित होते. या आमदार-खासदारांना लोक किती आणणार? हाच प्रश्‍न नेत्यांनी विचारल्याचे समजते. 

नागपूर जिल्ह्यातील आमदारांवर सर्वाधिक जबाबदारी टाकण्यात आली आहे. नागपूर शहरात भाजपचे सहा व ग्रामीण भागात 4 आमदार आहेत. या आमदारांना प्रत्येकी किमान 5 हजार लोक आणण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. यासाठी आवश्‍यक गाड्याची व्यवस्थेबद्दल नियोजन लवकरच केले जाणार आहे. यामुळे विदर्भातील भाजपच्या आमदारांना अमित शहा यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी चांगलेच `दक्ष' राहावे लागणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख