अमेठीतील राहुल गांधी - स्मृती इराणी या प्रतिष्ठेची लढतीकडे लागले देशाचे लक्ष 

अमेठी लोकसभा मतदारसंघात 5 विधानसभा मतदारसंघात येतात. या पाचपैकी तिलोई, सलोन, जगदीशपूर आणि अमेठी या चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. तर फक्त गौरीगंज येथे समाजवादी पार्टीचा आमदार आहे. कॉंग्रेसचा एकही आमदार नाही.
smriti-Rahul-Priyanka
smriti-Rahul-Priyanka

नवी दिल्ली :  कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध भाजपच्या स्मृती इराणी यांनी आव्हान उभे केले आहे. राहुल गांधी अमेठीचा गड अभेद्य राखण्यात यावेळीही यशस्वी होतात का? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. अमेठीत येत्या सोमवारी ( ता. ६) मतदान होणार आहे . 

केंद्रीयमंत्री स्मृती इराणी दुसऱ्यांदा राहुल गांधी यांच्या विरोधात उभ्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अमेठीत बळ एकवटले आहे. स्मृती इराणी यांनी गेल्या पाच वर्षात अमेठीत कार्यक्रमांचा आणि सभांचा धडाका उडवून दिलेला होता. स्मृती इराणी गेल्या वर्षभरापासून राहुल गांधी यांच्याविरोधात अत्यंत आक्रमक प्रचार करीत आहेत. 

राहुल गांधी यांनी केरळातील वायनाड या सुरक्षित मतदारसंघातून फॉर्म भरल्यापासून भाजप त्यांच्याविरोधात अधिकच आक्रमक आहे. स्मृती इराणी यांच्या प्रचाराला चोख उत्तर देण्यासाठी प्रियांका गांधी यांनी अमेठी मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रियांका गांधी थेट मतदारांशी गावोगावी जाऊन संपर्क करीत आहेत .  स्मृती इराणी आणि भाजपविरुद्ध प्रियांका गांधी अत्यंत प्रभावी प्रचार करीत आहेत . यंदा मोदी लाट नसली तरी अमेठीत अटीतटीची लढाई होईल असे मानले जाते.

2014 मध्ये अमेठीत राहुल गांधी व स्मृती इराणी यांच्यात पहिल्यांदा सामना झाला होता, तेव्हा राहुल गांधी यांना 4 लाख 8 हजार 651 मते मिळाली होती. तर स्मृती इराणी यांना 3 लाख 748 मते मिळाली होती.राहुल गांधी यांनी मोदी लाटेतही स्मृती इराणी यांचा एक लाखावर मतांनी पराभव केला होता.

मात्र त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत कॉंग्रेसला अपयशाचा सामना अमेठीत करावा लागला. 2015 मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकांत अमेठीत भाजपचा प्रभाव वाढला. या मतदारसंघातील अमेठी आणि जयास या दोन नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. तर गौरीगंज नगरपालिकेवर समाजवादी पार्टीचे वर्चस्व आहे.

2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका झाल्या. अमेठी लोकसभा मतदारसंघात 5 विधानसभा मतदारसंघात येतात. या पाचपैकी तिलोई, सलोन, जगदीशपूर आणि अमेठी या चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. तर फक्त गौरीगंज येथे समाजवादी पार्टीचा आमदार आहे. कॉंग्रेसचा एकही आमदार नाही.

यावेळी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने राहुल गांधी यांच्याविरोधात उमेदवार दिलेला नाही. दोन किरकोळ अपक्ष उमेदवारांचा अपवाद वगळता राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात सरळ लढत होणार आहे.

काँग्रेसचा बालेकिल्ला 

अमेठी लोकसभा मतदारसंघ 1967 मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून 1977 आणि 1998 चा अपवाद वगळता अमेठीतून कॉंग्रेस पक्षानेच विजय मिळविलेला आहे.

अमेठी लोकसभा मतदारसंघात 1977 मध्ये आणीबाणी विरोधी लाटेत जनता पार्टीचे रवींद्र प्रतापसिंह जिंकले होते. त्यांनी संजय गांधी यांचा धक्कादायक असा 75 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र 1980 मध्ये पुन्हा कॉंग्रेसतर्फे संजय गांधी अमेठीतून एक लाखांहून अधिक मताधिक्‍य घेऊन विजयी झाले होते.

तर 1998 मध्ये भाजपचे संजय सिंह यांनी कॉंग्रेसचे कॅप्टन सतीश शर्मा यांचा 24 हजार मतांनी पराभव केला होता. बसपाच्या महंमद नईम यांनी दीड लाख मते घेतली होती.

कै. संजय गांधी यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसतर्फे पहिल्यांदाच राजीव गांधी यांनी निवडणूक लढवून सव्वा दोन लाखांच्या मताधिक्‍याने विजय मिळवला होता. राजीव गांधी यांना तेव्हा झालेल्या मतदानाच्या 84 टक्के मते मिळाली होती.

1984 मध्ये संजय गांधी यांच्या पत्नी मनेका गांधींनी आपले दीर राजीव गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती. तेव्हा राजीव गांधी यांना 3 लाख 65 हजार 41 तर मनेका गांधी यांना फक्त 50 हजार 163 मते मिळाली होती.

1989 मध्येही राजीव गांधी 2 लाख मतांची आघाडी घेऊन जिंकले होते.

1991 व 1996 मध्ये कॉंग्रेसतर्फे कॅप्टन सतीश शर्मा खासदार झाले. पण 1998 मध्ये सतीश शर्मा पराभूत झाले होते.

सोनिया गांधींनी 1999 मध्ये पहिल्यांदा अमेठीतून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्या तीन लाखांचे मताधिक्‍य मिळवून विजयी झाल्या होत्या.

सोनिया गांधी यांनी स्वतःसाठी रायबरेली मतदारसंघ निवडून 2004 मध्ये राहुल गांधींना अमेठीतून उभे केले होते. राहुल गांधी 2 लाख 90 हजारांची मोठी आघाडी घेऊन अमेठीचे खासदार झाले होते.

2009 च्या निवडणुकीतही राहुल गांधींनी 3 लाख 70 हजार 198 मताधिक्‍यासह मोठा विजय मिळविला होता. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com