Ambedkar should point outmy fault I will beg his pardon : Imtiaz Jaleel | Sarkarnama

आंबेडकरांनी चूक सांगावी, मी माफी मागेन :  इम्तियाज जलील

जगदीश पानसरे 
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

..

औरंगाबादः वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमकडे लोक राज्यात मोठा पर्याय म्हणून पाहत होते. प्रकाश आंबेडकरांनी अजूनही ओवेसींना एक फोन केला तर आघाडी बाबात फेरविचार होऊ शकतो.   आंबेडकरांनी माझ्याशी बोलणार नाही ही भूमिका का घेतली? माझी चूक सांगावी मी त्यांची घरी जाऊन आणि जाहीर सभेत देखील माफी मागेन, असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीसोबत एमआयएमची युती तुटण्याला प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांना जबाबदार धरले जाते. यावर पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देतांना इम्तियाज जलील म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत युती करतांना एमआयएमने जो प्रस्ताव बाळासाहेबांकडे दिला होता, त्यावर लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून निवडणूकीच्या तयारीला लागतील एवढा एकच फोन मी त्यांना केला होता.

परंतु त्यानंतर आंबेडकरांनी मी इम्तियाज जलील यांच्याशी आघाडी संदर्भात बोलणार नाही अशी भूमिका घेतली. त्यांनी असा पावित्रा का घेतला? हे मला अजूनही समजले नाही. त्यांनी माझी चूक सांगावी मी त्यांची घरी जाऊन आणि जाहीर सभेत देखील माफी मागायला तयार आहे. वंचित सोबतची बोलणी आम्ही रोखून आघाडी तोडली हा प्रकाश आंबेडकरांचा आरोप खरा आहे. पण आम्हाला केवळ आठ जागा देण्याची तयारी त्यांनी दाखवल्यानंतर आमच्या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या सहमतीने निर्णय घेऊनच मी प्रसिध्दी पत्रक काढले होते.

वंचित सोबतच्या आघाडीच्या आशा अजूनही कायम आहेत, फक्त त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेऊन ओवेसींना फोन करावा, हैदराबादेत जाऊन चर्चा केली तर अर्ध्या तासात मार्ग निघू शकतो. पण प्रकाश आंबेडकर आम्हाला आठ जागा देण्याच्या निर्णयावर जर ठाम राहिले तर मात्र आमचा नाईलाज असेल असेही इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख