Ambedkar Monument only on 7 acres | Sarkarnama

इंदूमिलमधील केवळ 7 एकर जागेवरच डॉ. आंबेडकरांचे स्मारक

गोविंद तुपे
गुरुवार, 13 एप्रिल 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी संपुर्ण जागा देण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. संपुर्ण जागा दिली सुध्दा आहे. काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालून पुर्ण करून घेईन. स्मारकाच्या बाबतीत कुठलीही तडजोड सरकारकडून केली जाणार नाही.- राजकुमार बडोले - सामाजिक न्याय मंत्री

मुंबई - दादरच्या इंदू मिल परीसरातील 12 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधण्याची घोषणा सरकारने मोठ्या थाटामाटात केली. पंतप्रधानांच्या हस्ते या जागेचे भूमिपूजनही करण्यात आले. मात्र नगरविकास खात्याने नुकत्याच काढलेल्या परिपत्रकामुळे 12 एकर पैकी फक्त 7 एकर जागाच प्रत्यक्ष स्मारकाच्या बांधकामासाठी वापरता येणार आहे. सीआरझेडच्या नियमावर बोट ठेवीत यातील उर्वरीत पाच एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या आंबेडकर अनुयायांनी सरकारला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

इंदू मिलची संपुर्ण 12 एकर जागा डॉ आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळावी यासाठी पाठपुरावा करणारे आंबेडकर अनुयायी चंद्रकात भंडारे यांना सरकारने दिलेल्या लेखी पत्रात ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. 'एमएमआरडीए'चे महाव्यवस्थापक संपतकुमार यांनी भंडारे यांना लिहिलेल्या पत्रासोबत इंदू मिलबाबतची काही कागदपत्रेही पाठविली आहेत. त्यात 12 एकर जागेची ताबा पावती, पर्यावरण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र आणि नगरविकास खात्याच्या परिपत्रकांचा समावेश आहे. या परिपत्रकात फक्त सात एकर (2.81 हेक्‍टर)जागेवरच बांधकाम करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.उर्वरीत पाच एकर (2.3 हेक्‍टर) जागेवर बांधकाम करता येणार नसल्याचेही यावर नमूद करण्यात आले आहे.

राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असणाऱ्या सरकारने संपुर्ण 12 एकर जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी द्यायला हवी. उर्वरीत पाच एकर जागेवरही बांधकामाची परवानगी द्यावी यामागणीसाठी आम्ही सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
चंद्रकांत भंडारे - इंदूमिलची मूळ मागणी करणारे आंबेडकरी अनुयायी

संपुर्ण जागा दिली आहे

सुरूवातीला आम्ही फक्त सात एकर जागेबाबत परिपत्रक काढले होते. मात्र त्यात सुधारणा करून केंद्र आणि राज्य सरकारची परवानगीने नविन परिपत्रक काढण्यात आले आहे. पण ते परिपत्रक केंव्हा काढले हे मला नक्की सांगता येणार नाही. मात्र उर्वरीत पाच एकर जागेवरही आता बांधकाम करता येणार आहे.
संपतकुमार - महाव्यवस्थापक, एमएमआरडीए

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख