ambarnath-municipal-corporations-sweeper-wins-prize-money-kbc | Sarkarnama

अंबरनाथच्या सफाई कामगाराने 'केबीसी'त जिंकले १२ लाख !

दिनेश गोगी
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनिषा वाडेकर, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाडेकर यांनी या कामगाराला शाबासकी दिली असून या कामगाराचा महासभेत जाहीर  गौरव करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी देविदास पवार यांनी  दिली.

उल्हासनगर :  खाकी ड्रेस परिधान करून तो शहरातील नाले गटारी साफ करतो.पण रोज विविध पुस्तके-वर्तमान पत्रे वाचण्याची-अभ्यासाची आवड. एखाद्या दिवशी कौन बनेगा करोडपती हाताळणारे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या समोरील "हॉटसीट'वर बसण्याच्या संधीची तो  प्रतिक्षा करीत होता . संधी मिळताच त्याने  चीज केले .  "हॉटसीट" गाजवताना चक्क साडेबारा लाख रुपये जिंकले .

ही लक्षवेधक कहाणी अंबरनाथ नगरपरिषद मध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगार मनीष पाटीलची आहे. अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनिषा वाडेकर, शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाडेकर यांनी या कामगाराला शाबासकी दिली असून या कामगाराचा महासभेत जाहीर  गौरव करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी देविदास पवार यांनी  दिली.

 मनीष पाटील   गेल्या 20 वर्षांपासून अंबरनाथ शहरातील नाले-गटारी साफ करतात. मूळ कोकण रत्नागिरी राजापूरातील एका गावाचे असलेले मनीष सेवा योजन खात्यामार्फत सफाई कामगार म्हणून कामाला लागले. शिक्षण जेमतेम दहावी  पास. पत्नी एक मुलगा व मुलगी असा हम दो हमारे दो चा लहान परिवार. मनिषला वाचण्याची मोठी आवड. फावल्या वेळात तो पुस्तकात-वर्तमानपत्रात हरवून जातो. त्यातून त्याची बुद्धी तल्लख होत गेली. त्याला कौन बनेगा करोडपती बघण्याची नित्याची सवय. एखाद्या दिवशी आपणासही हॉटसीटवर बसण्याची संधी मिळावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती .

केबीसी मध्ये सहभागी होण्यासाठी अमिताभ बच्चन विचारत असलेल्या उत्तरे पाठवण्याचा प्रयत्न त्यांनी केला .जुलै महिन्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तंतोतंत देणाऱ्या मनीष पाटीलला   25 सप्टेंबर रोजी केबीसी मध्ये बोलावले गेले . तिथे आलेल्या सर्व स्पर्धकांना अमिताभ बच्चन प्रश्न देतात. काही स्पर्धक बरोबर उत्तरे देतात. मात्र कमी सेकंदात परफेक्ट उत्तर देणाऱ्या मनीष पाटीलला  हॉटसीट वर बसण्याची संधी मिळाली .

 25 तारखेला मनीषने  दोन प्रश्नांची उत्तरे दिली .वेळ संपल्याने पुन्हा 26 तारखेला पुन्हा हॉटसीट वर बसण्याची संधी मिळाली .मनीष 12 प्रश्नांची उत्तरे देण्यात यशस्वी झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी त्याच्या खात्यात साडेबारा लाख रुपये ट्रान्सफर केले .तेरावा प्रश्न 25 लाखांचा.त्याचे उत्तर देता येत नसल्याने मनीषने माघार घेऊन साडेबारा लाख रुपयांवर समाधान मानले.

नगराध्यक्षा मनीषा वाडेकर,शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांनी मनिषला शाबासकी दिली आहे.यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर,ऍड.निखिल वाडेकर उपस्थित होते. तर येत्या महासभेत मनीष पाटील याचा जाहीर गौरव करण्यात येणार आहे.त्याच्या पदोन्नती बाबतही सकारात्मक विचार केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी देविदास पवार यांनी  सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख