बहुमत असूनही अंबादास दानवे का घाबरत आहेत - बाबुराव कुलकर्णी

 बहुमत असूनही अंबादास दानवे का घाबरत आहेत - बाबुराव कुलकर्णी

जालना : महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे यांच्याकडे बहुमत आहे, तरीही ते अतिरिक्त मत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माझ्यापरीने मी देखील मतदारांच्या भेटीगाठी, बैठका घेतोय, पण ते सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांच्या बातम्या येतात, मी विरोधी पक्षाचा असल्यामुळे माझ्या येत नाहीत अशी खंत व्यक्त करतानाच दानवेंकडे बहुमत असतांना ते का घाबरत आहेत अशी गुगली देखील कॉंग्रेस-आघाडीचे औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्यचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांनी टाकली आहे. 

येत्या 19 ऑगस्टला स्थानिक स्वराज्यसाठी मतदान होत आहे. युतीचे अंबादास दानवे आणि आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांच्यात थेट लढत होत आहे. अंबादास दानवे यांच्या विजयासाठी शिवसेनेसह भाजपचे पदाधिकारी आणि मुंबईहून आलेली स्थानिय लोकाधिकार समितीची टिमही कामाला लागली आहे. दानवे यांनी प्रचारात आघाडी घेत विविध पक्षांच्या सदस्यांचा पाठिंबा देखील मिळवला आहे. तर दुसरीकडे आघाडीचे बाबुराव कुलकर्णी यांचा प्रचार फारसा होतांना दिसत नाहीये. 

या संदर्भात "सरकारनामा' च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी निवडणूक लढवतोय म्हटल्यावर सदस्यांच्या भेटीगाठी घेणार हे निश्‍चितच आहे. जालना आणि औरंगाबाद या दोन्ही जिल्ह्यातील मतदार सदस्यांच्या संपर्कात मी आहे. भ्रष्टाचारमुक्त निवडणुकीच्या संकल्पावर मी कायम आहे, याबद्दल शंका उपस्थित करण्याचे कारणच नाही. त्यामुळे कॉंग्रेस-आघाडीचे अडीचशे सदस्य कुठेही सहलीवर जाणार नाहीत ? किंवा त्यांना मी घेऊन जाणार नाही. ते आपल्या घरीच निवांत असतील आणि मतदानांच्या दिवशी सद्‌सदविवेक बुध्दीने मतदान करतील. 

अंबादास दानवे सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे त्यांचा प्रचार, भेटीगाठी, बैठकांच्या बातम्या प्रसिध्द होतात. मी विरोधी पक्षाचा असल्यामुळे माझ्या येत नाही एवढाच काय तो फरक ? प्रत्येक उमेदवार निवडणूक आपल्या पध्दतीने लढवत असतो. पारदर्शक, भ्रष्टाचार मुक्त आणि कुठल्याही प्रलोभनाशिवाय ही निवडणूक पार पडावी यावर माझे आणि अंबादास दानवे यांचे एकमत झाल्यामुळे आम्ही एकत्रित निवेदन केले होते. पण याचा अर्थ मी निवडणुकीतून माघार घेतली असा कुणी काढत असेल तर तो चुकीचा आहे. 

एमआयएम, अपक्ष योग्य निर्णय घेतील 
आमदार अब्दुल सत्तार यांनी 81 सदस्य आपल्या सोबत असल्याचे सांगत अंबादास दानवे यांना पाठिंबा जाहीर केल्याच्या मुद्याकडे कुलकर्णी यांचे लक्ष वेधले. यावर कॉंग्रेस - राष्ट्रवादीकडे अडीचशे सदस्य आहेत असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. एमआयएम, अपक्ष आणि अन्य सदस्यांची संख्याही लक्षवेधी आहे. त्यामुळे आज कुणी कितीही दावे-प्रतिदावे करत असले तरी मतदानाच्या दिवशी सदस्य काय भूमिका घेतात यावर सगळे काही अवलंबून आहे, आणि ते योग्य निर्णय घेतील याची मला खात्री असल्याचे बाबुराव कुलकर्णी यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com