मतदानयंत्रात घोळ झाल्याची नेवासे मतदारसंघात तोंडी तक्रार 

या संदर्भात चाचणी मतदान घेता येते; मात्र "त्याकरिता प्रतिज्ञापत्र भरून द्या; खोटी माहिती आढळल्यास कारवाई केली जाईल,' असे सांगितले. त्यावर तक्रार करणाऱ्यांनी माहिती खोटी असल्याचे सांगत, केवळ चिठ्ठी उशिरा येत आहे, असे म्हणत तेथून काढता पाय घेतला, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी रूपेशकुमार सुराणा यांनी दिली.
मतदानयंत्रात घोळ झाल्याची नेवासे मतदारसंघात तोंडी तक्रार 

नेवासे (नगर) : नेवासे मतदारसंघात नेवासे बुद्रुक बूथ क्रमांक 15 येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात घोळ झाल्याची तक्रार आहे. मतदान यंत्रावरील क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या नावापुढील सात क्रमांकाचे बटन दाबले, की भाजपचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नावासमोरील पहिल्या क्रमांकाचा दिवा लागत असल्याची तोंडी तक्रार करण्यात आली.

ही तक्रार काल (सोमवारी) मतदान प्रक्रियेदरम्यान क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केली. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे मतदारसंघातील निकालावर काही परिणाम झाला, तर त्याविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

मतदानाच्या दिवशी काल मतदान केंद्रावर यंत्रात घोळ असल्याचे अनेकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. अशा प्रकारामुळे मतदारांमध्ये मोठी नाराजी दिसून आली. सात क्रमांकाचे बटन दाबले, की पहिल्या क्रमांकाचा दिवा लागत होता. या प्रकारानंतर क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या समर्थकांनी तेथे मोठी गर्दी केली. त्यानंतर तक्रार दाखल करण्याची मागणी केली; परंतु तक्रार दाखल झाली नाही. याबाबतचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियात पसरले. मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच 80.07 टक्के एवढे विक्रमी मतदान झाले. हे मतदान विद्यमान आमदाराच्या विरोधात होते. संबंधित मतदान केंद्रावर तहसीलदार आल्यानंतर त्यांना या संदर्भातील सर्व पुरावे दाखविले. मात्र, त्यांनी आमची तक्रार दाखल करून घेण्यास सपशेल नकार दिला, असा आरोप "क्रांतिकारी'च्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

मतदान यंत्रात घोळ होत असल्याची बाब वारंवार संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, दाद मिळाली नाही. त्यामुळे आम्ही आमच्या नेत्याशी विचारविनिमय करून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे शुक्रवारी लेखी तक्रार करणार आहोत, असे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे बाळासाहेब कोकणे यांनी सांगितले.
 
मतदान यंत्रांबाबत तक्रार करणाऱ्यांच्या शंकेचे तत्काळ निरसन करण्यात आले. या संदर्भात चाचणी मतदान घेता येते; मात्र "त्याकरिता प्रतिज्ञापत्र भरून द्या; खोटी माहिती आढळल्यास कारवाई केली जाईल,' असे सांगितले. त्यावर तक्रार करणाऱ्यांनी माहिती खोटी असल्याचे सांगत, केवळ चिठ्ठी उशिरा येत आहे, असे म्हणत तेथून काढता पाय घेतला, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी रूपेशकुमार सुराणा यांनी दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com