मदन भोसलेंचा तुघलकी कारभार; त्यांच्याविरूद्ध उठाव करा!

पंधरा वर्षांपूर्वी संचालकपदाचा राजीनामा देणारे मदन भोसले आता स्वतः अध्यक्ष असताना ऊस उत्पादकांची आणि कामगारांची पिळवणूक करीत आहेत. आपल्या तुघलकी कारभारामुळे त्यांनी कारखान्याला कर्जाच्या खाईत लोटले आहे.
alligation against madan bhosale
alligation against madan bhosale

सातारा : प्रतापगड- खंडाळा सहकारी साखर कारखाना बंद ठेवल्याने आणि किसन वीर कारखान्यातही अपेक्षित क्षमतेने गाळप होत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. व्यवस्थापनाचा तुघलकी कारभार, चुकीचे नियोजन आणि आर्थिक गैरव्यवहारांमुळे कारखान्यावर ही अवस्था ओढवली आहे, असे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब कदम, बाबूराव शिंदे, राजेंद्र शेलार यांनी म्हटले आहे. 

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की तीनही कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची नोंद करून घेतली आहे. नोंद झालेल्या उसाचे गळीत वेळेवर करणे, ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे; परंतु कारखान्याची आर्थिक अवस्था डबघाईची असल्याने ऊस तोडणी यंत्रणा कार्यान्वित करता आली नाही. यात कुठेही सभासदांना विश्वासात न घेता आपल्या नियंत्रणातील दोन्ही कारखाने बंद ठेवण्यात आले आणि केवळ किसन वीर कारखान्याचे गळीत सुरू आहे. इथेही अधिकांशाने यंत्राद्वारेच ऊस तोडणी सुरू असून रोजच्या गळितासाठी अपेक्षित ऊस आणण्याएवढी तोडणी यंत्रणा इथे नाही. 

गेली अनेक वर्षे ऊस बिले इतरांच्या तुलनेत कमी आणि दिरंगाईने मिळत असतानाही संयम राखत आपल्या संस्थेसाठी आर्थिक तोटा स्वीकारला. शेकडो कोटी रुपयांचे नुकसान सोसणाऱ्या ऊस उत्पादकांना अधिकाधिक नागवण्याचा निष्ठुरपणा व्यवस्थापन करीत आहे. 'एफआरपी' कमी देता यावी म्हणून जाणीवपूर्वक साखर उतारा कमी ठेवून ऊसदर पाडण्याचा आणि तोही वेळेत-एकरकमी न देण्याचा आगळा उच्चांक 'किसन वीर'च्या नावावर आता जमा आहे.  

सलग दहा-दहा महिने पगार थकीत असतानाही कर्मचारी काम करीत आहेत; परंतु याची चाड व्यवस्थापनाला दिसत नाही. या कामगारांची संघटना मोडून काढली. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम व्यवस्थापन वेळेवर भरू शकत नाही. घोषित केलेला ऊसदर देता येत नाही म्हणून पंधरा वर्षांपूर्वी संचालकपदाचा राजीनामा देणारे मदन भोसले आता स्वतः अध्यक्ष असताना ऊस उत्पादकांची आणि कामगारांची पिळवणूक करीत आहेत. आपल्या तुघलकी कारभारामुळे त्यांनी कारखान्याला कर्जाच्या खाईत लोटले आहे. या साऱ्या परिस्थितीची नोंद घेऊन कारखान्याला पूर्वपदावर आणण्यासाठी सभासदांनीच उत्स्फूर्त उठाव करावा, असे आवाहनही या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com