भाजपला मित्रपक्षांनी मागितल्या 54  जागा !

jankar_atawale_mete.
jankar_atawale_mete.

सोलापूर : भाजप-शिवसेना युती होणारच, असे दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी ठासून सांगत असतानाच मित्रपक्षांनी युतीकडे विशेषत: भाजपकडे 54 जागांची मागणी केली आहे.

त्यामध्ये रिपाइंने (आठवले गट) 18 तर 'रासप'ने 18 जागा मागितल्या आहेत .  रयत क्रांतीने 12 तर 'शिवसंग्राम'ने सहा जागांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने या मित्र पक्षांना भाजपने आपल्या कोट्यातून जागा सोडाव्यात असे  सांगितले असल्याचे समजते . 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्षांनी भाजपच्या चिन्हावर उमेदवार उभे करावेत अशी सूचना केली पण महादेव जाणकार यांनी आपल्या पक्षाचेच चिन्ह वापरण्याबाबत आग्रही भूमिका घेण्यात आली आहे . 

त्यामुळे युतीसमोरील अडचणीत वाढ झाली असून युती होईल की नाही याबाबत साशंकता असल्याने दोन्ही पक्षांनी आता मतदारसंघनिहाय इच्छुकांची यादी मागवायला सुरवात केल्याचेही समजते.

लोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांनी भाजपकडे चार जागांची मागणी करूनही रिपाइंला एकही जागा मिळाली नाही. मात्र, आठवले यांना केंद्रात पुन्हा सामाजिक न्याय राज्यमंत्रिपद मिळाले.

मात्र, दुसरीकडे कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर निघाला. त्या पार्श्‍वभूमीवर आता रिपाइंने भाजपकडे 18 जागांची मागणी केली असून सोलापुरातील मोहोळ व माळशिरस या दोन जागांसह 10 जागा मिळायलाच हव्यात, अशी ठाम भूमिका आठवले यांनी घेतली आहे. 

तर दक्षिण सोलापूर, करमाळ्यासह बारामती, इंदापूरसह राज्यभरातील 18 जागांवर 'रासप'चे प्रमुख पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर ठाम असल्याची चर्चा आहे. तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीनेही माढा, पंढरपूर-मंगळवेढ्यासह राज्यातील 12 जागांची मागणी केली आहे . 

 विनायक मेटे यांच्या 'शिवसंग्राम'नेही सहा जागांची मागणी केल्याने युतीचा जागा वाटपाचा तिढा वाढल्याची चर्चा आहे. विनायक मेटे यांना बीडची जागा हवी आहे. बीडला  शिवसेनेने जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीतून प्रवेश दिला आणि मंत्रीही केले. आता बीडची जागा शिवसेना सोडुमित्र पक्षाला सोडू शकत नाही . 

कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीत दलित, धनगर, मुस्लिमसह अन्य समाज घटकांचे आकर्षण आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरण बदलले असतानाही रासप व रिपाइंच्या कार्यकर्त्यांचा 'वंचित'कडे अनेकांचा ओढा वाढल्याची चर्चा आहे.

तर संभाजी ब्रिगेडनेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने 'शिवसंग्राम' मागणी केलेल्या जागांवर ठाम असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नियोजनानंतर रयत क्रांतीला जाग आली असून त्यांनीही किमान आठ जागा मिळतील, असा विश्‍वास बाळगला आहे. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याच्या उद्देशाने मित्रपक्ष मागणी केलेल्या जागांवर ठाम असल्याचीही चर्चा आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com