नगरचे बदलले वारे, विखें विरोधात झाले सारे

radhakrishan vikhe patil faces challenges in nagar
radhakrishan vikhe patil faces challenges in nagar

नगर : ज्येष्ठ नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काॅंग्रेसला हात दाखवून भाजपमध्ये प्रवेश केला. नंतर नगर जिल्ह्यात 12 विरुद्ध शून्यच्या घोषणेने भाजपचे उमेदवार हुरळून गेले. पण झाले उलटेच. भाजपचे केवळ तीनच आमदार निवडून आले. अर्थात हे खापर विखेंवरच फोडले गेले. त्यामुळेच सध्या भाजप-काॅंग्रेससह  भाजपचे नेतेही विखे यांच्यावर नाराज आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळविली. त्यात त्यांना यशही आले. त्यांच्या विजयासाठी वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना पाठिंबा देत विखे पॅटर्न राबविला. डाॅ. विखे पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे आत्मविश्वास बळावला. भाजपने राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेवून विधानसभेची मोट बांधली. आपल्याच हातात संपूर्ण जिल्ह्याची दोरी असल्याचे भासवत विखे पाटील यांनी राज्याबरोबरच केंद्रातही आपली वेगळी छाप पाडली. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 12 विरुद्ध शून्यची घोषणा देऊन विखे पाटील यांनी संपूर्ण जिल्हाच भाजपमय करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेवर भाजप श्रेष्ठी खूष होते. 

उमेदवारी वाटपापासून बिनसले

विधानसभा निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर भाजप-शिवसेना युतीचा घोळ सुरू झाला. त्यामुळे लवकर उमेदवार निश्चित होईनात. भाजपचे सर्वच उमेदवार विखे पाटील हेच निश्चित करतील, अशीच शक्यता होती. तसे वातावरण भासवले गेले. मात्र त्यांनीच सुचविलेले उमेदवार तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचे बोलले जाते. तेथूनच भाजपश्रेष्ठी व विखे पाटील यांच्यात खटकल्याचे मानले जाते. उमेदवार निश्चितीनंतर मात्र विखे पाटील यांनी संबंधित उमेदवारांचे हवे तसे काम केले नाही, उलट काही उमेदवार पाडण्यासाठीच प्रयत्न केले, असाही आरोप पराभूत झालेल्यांकडून केला जात आहे. काल नाशिक येथे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनीही विखे पाटील यांच्यावर थेट आरोप करून त्याचा भांडाफोड केला. त्यापूर्वी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही विखे पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अडचणींवर चर्चा करताना जिल्हा बॅंकेत कर्डिले यांनी विखे पाटील यांच्यावर थेट तोफ टाकली. यापूर्वी हे नेते आतल्या दारातून बोलत होते, आता ते थेट जाहीरपणे बोलू लागले आहेत.


जिल्हा परिषदेतील सत्ताही धोक्यात

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी सध्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील आहेत. आगामी महिनाभरात होऊ घातलेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत त्यांचेही पद धोक्यात आले आहे. त्या काॅंग्रेसच्या उमेदवारीवर अध्यक्षा झाल्या होत्या. सध्या परिस्थिती बदलली आहे. पती व मुलगा भाजपमध्ये गेले असले, तरी त्या अधिकृतपणे काॅंग्रेसमध्येच आहेत. अध्यक्ष निवडीमध्ये काॅंग्रेसने सदस्यांना व्हीप बजावल्यास शालिनी विखे पाटील यांना एक तर काॅंग्रेसच्या उमेदवाराला मतदान करावा लागेल किंवा त्यांना गैरहजर रहावा लागणार आहेत. आता बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांना पुन्हा अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता नाही. याच पार्श्वभूमीवर यापूर्वी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी भाजपचाच अध्यक्ष होईल, असे विधान करून विखे पाटील यांना चिमटा काढला होता. एकूणच बदलत्या परिस्थितीत जिल्हा परिषदेची सत्ता विखे पाटील यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com