सर्वच पक्षात बंडखोरी झाली "व्हायरल' 

सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी "व्हायरल' झाली असून, या बंडोबांची समजूत काढताना पक्षाच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सर्वच पक्षात बंडखोरी झाली "व्हायरल'
सर्वच पक्षात बंडखोरी झाली "व्हायरल'

अकोला : महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वपक्षीयांविरोधातच दंड थोपटले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी "व्हायरल' झाली असून, या बंडोबांची समजूत काढताना पक्षाच्या नेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे धुमशान जोरात सुरू आहे. हद्दवाढीनंतर सीमावर्ती भागातील गावांचा महापालिकेत समावेश झाल्याने नवीन प्रभागरचनेनुसार वीस प्रभागातून ऐंशी नगरसेवक निवडून येणार आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढत असून, त्यादृष्टीने आधीपासूनच मोर्चेबांधणी करण्यात आली. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपमध्ये उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. हीच परिस्थिती शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भारिप बमसंमध्येही असल्याने उमेदवार ठरविताना नेत्यांना मोठी कसरत करावी लागली आहे. नवीन प्रभागरचनेनुसार प्रभागातील सामाजिक समीकरण व उमेदवारांची प्रभागातील लोकप्रियता लक्षात घेऊन उमेदवार ठरविण्यात आले; मात्र उमेदवारी नाकारलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांनी स्वपक्षीयांविरोधातच दंड थोपटल्याने राजकीय वातावरण तापले आहे. 

भाजपच्या विद्यमान नगरसेविका कल्पना गावंडे, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उषा विरक, शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू गाढे, भाजपचे मनोज साहू, मनसेचे अमित ठाकरे, कॉंग्रेसचे विजय दुतोंडे, मयूर विखे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी दाखल केली आहे, तर युवक कॉंग्रेसचे अकोला पूर्व विधानसभा अध्यक्ष तसेच कोअर कमिटीचे सचिव सोमेश्वर डिगे, शिवसेना भौरद सर्कल प्रमुख भारत बुडूकले, माजी ग्रामविकास अधिकारी रमेश गोतमारे यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भारिप-बमसंमध्ये प्रवेश करून उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांच्या बंडखोरीचा पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना फटका बसणार असल्याने निवडणुकीचे धुमशान वाढले आहे. या निवडणुकीत पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांची समजूत काढताना नेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. 

भाजपने दिला अनेकांना डच्चू 
विद्यमान महापौर उज्ज्वला देशमुख, नगरसेवक गोपी ठाकरे, नगरसेवक योगेश गोतमारे यांना भाजपने तिकीट वाटपात डच्चू दिला आहे. उज्ज्वला देशमुख यांच्यासह काही नगरसेवकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असल्याने निवडणुकीचे वातावरण तापले आहे. 

उमेदवारांनी दाखल केले नामांकन 
महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष अशा उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com