औरंगाबाद भाजप शहर-जिल्हाध्यक्ष निवडीवरून धुसफूस

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपने शहर आणि जिल्ह्याची जबाबदारी देताना जुन्या, नव्याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला असला तरी यातून अंतर्गत गटबाजीचे दर्शन देखील घडले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हाध्यक्षपदी विजय औताडे यांची वर्णी लावून जालन्या पाठोपाठ औरंगाबादवर देखील आपले वर्चस्व राखण्याचा एकप्रकारे प्रयत्न केला आहे
Internal Factions Reflected in Aurangabad BJP President Election
Internal Factions Reflected in Aurangabad BJP President Election

औरंगाबाद : भाजपच्या शहर व जिल्हाध्यक्षपदाची निवड सोमवारी करण्यात आली. मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे लाक्षणिक उपोषण सुरू असतांनाच लगबगीने सायंकाळी शहर अध्यक्षपदी संजय केणेकर, तर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक विजय औताडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या निवडीवरून आता भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपने शहर आणि जिल्ह्याची जबाबदारी देताना जुन्या, नव्याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला असला तरी यातून अंतर्गत गटबाजीचे दर्शन देखील घडले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हाध्यक्षपदी विजय औताडे यांची वर्णी लावून जालन्या पाठोपाठ औरंगाबादवर देखील आपले वर्चस्व राखण्याचा एकप्रकारे प्रयत्न केला आहे.

मावळते शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपने आपल्या भूमिकेत बदल करत मुळ भाजपच्या जुन्या, निष्ठावंतांना झुकते माप देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. पण तनवाणी यांच्या बाबतीत लागू झालेला नियम जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांच्यासाठी मात्र नसल्याचे देखील दिसून आले.

शिवसेनेतून भाजपमध्ये आल्यानंतर किशनचंद तनवाणी यांना थेट शहराध्यक्ष करण्यात आले होते. तेव्हा बोहरून आलेल्यांना मोठी पदे देऊन निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. विजय औताडे यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना देखील भाजयुमोची मोठी जबाबदारी देण्यात आली होती. पण रावसाहेब दानवे यांचे पाहुणे असल्यामुळे त्यांच्याबद्दलचा विरोध नंतर मावळला आणि त्यांना थेट उपमहापौर देखील करण्यात आले होते.

तनवाणींच्या नाराजीचा फटका?

शिवसेना-भाजप युती 2014 मध्ये तुटल्यानंतर तनवाणी यांनी मध्यमधून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला होता. उमेदवारी तर मिळाली पण हिंदू मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्यामुळे त्यांना आमदार मात्र होता आले नव्हते. 
शिवसेनेतून बाहेर पडतांना तनवाणी यांनी अनेक आजी, माजी नगरसवेकांना सोबत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपली उपद्रव शक्ती सिध्द करत शिवसेनेला आपणच रोखू शकतो असा विश्‍वास त्यांनी भाजमधील वरिष्ठांना दिला होता.

शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात तनवाणी यांनी शिवसेनेला लक्ष्य करत अनेकांचे भाजपमध्ये प्रवेश करवून घेतले. महापालिका निवडणुकीच्या राजकारणात देखील तनवाणी यांनी शिवसेनेवर अंकुश ठेवण्याचे काम केले. परंतु तनवाणी यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका या शिवसेनेला सोयीस्कर ठरणाऱ्या होत्या असा आरोप देखील त्यांच्यावर पक्षातील विरोधकांकडून केला गेला.

त्यामुळे तनवाणी यांना टाळून नजीकच्या काळात महापालिकेतील अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले. अगदी तत्कालीन भाजप उपमहापौर विजय औताडे यांनी दिलेला राजीनामा देखील त्याचाच भाग होता. त्यामुळे तनवाणी यांना शहराध्यक्षपदी पुन्हा संधी मिळू नये यासाठी भाजपमधील एक मोठा गट प्रयत्नशील होता. वरिष्ठ नेत्यांकडूनही त्याला बळ मिळाल्याने अखेर तनवाणी यांची महापालिका निवडणुकीमुळे एक संधी मिळावी ही इच्छा अपुर्णच राहिली.

या शिवाय विधानसभा निवडणुकीत युतीमुळे मध्य विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटला, तेव्हा उमेदवारीसाठी तनवाणी यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे तनवाणी पुन्हा शिवसेनेत जाणार असे चित्र त्यावेळी निर्माण झाले होते. शहराध्यक्षपदाच्या निवडीत हा मुद्दा देखील विचारात घेतला गेल्याची चर्चा आहे. आता महापालिका निवडणुकीत तनवाणी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बागडेंचेही मौन..

भाजपचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा आमदार हरिभाऊ बागडे यांना देखील शहर-जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीपासून दूर ठेवण्यात आल्याचे बोलले जाते. त्यामुळेच शहरात असून देखील बागडे निवड प्रक्रियेपासून लांब राहिले. जिल्हाध्यक्षपदी विजय औताडेंची वर्णी लावत खासदार दानवे यांनी बागडेंवर पुन्हा एकदा कुरघोडी केली आहे.

म्हाडाचे सभापती आणि भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष संजय केणेकर हे भाजपमधील जुने आणि निष्ठावान पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीवर कुणी आक्षेप घेण्याचे कारण नाही हे जरी खरे असले तरी पक्षाच्या आंदोलनात कधीही न दिसणारे असे त्यांच्या बाबतीत बोलले जाते.

शहर-जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबद्दल तुम्ही नाराज आहात का? असा प्रश्‍न बागडे यांना विचारला असता " मी नाराज नाही, पण मी तिथे जाऊ शकलो नाही,'' एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावरून त्यांची नाराजी उघड होते. तर माजी राज्यमंत्री व आमदार अतुल सावे यांनी या निवडीवर सावध भूमिका घेतली आहे.  केणेकर-औताडे यांच्यावर शहर व जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे दोघे नव्याने पक्षाची बांधणी कशी करतात यावरच पुढील यश अवलंबून असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com