अकोले विधानसभा मतदारसंघ : पिचड हुकमी एक्का, त्यांना कोण देणार धक्का

आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या अकोले मतदारसंघात दरवर्षीप्रमाणे यंदाही हुकमी एक्का म्हणून पिचड कुटुंबियांकडे पाहिले जाणार आहे. विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड यांची आघाडीकडून उमेदवारी निश्चित राहणार आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी या वेळी कोण-कोण उतरते, हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.
 अकोले विधानसभा मतदारसंघ : पिचड हुकमी एक्का, त्यांना कोण देणार धक्का

नगर : आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या अकोले मतदारसंघात दरवर्षीप्रमाणे यंदाही हुकमी एक्का म्हणून पिचड कुटुंबियांकडे पाहिले जाणार आहे. विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार वैभव पिचड यांची आघाडीकडून उमेदवारी निश्चित राहणार आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी या वेळी कोण-कोण उतरते, हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

या मतदारसंघावर कायमच राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्याशिवाय कोणतेही नेतृत्त्व या मतदारसंघातून पुढे येताना दिसत नाही. या मतदारसंघात १९८० पासून ते २०१४ पर्यंत मधुकरराव पिचड आमदार होते. या सात पंचवार्षिकमध्ये त्यांनी अनेकदा मंत्रीपदे भूषविली. त्यानंतर त्यांचे पूत्र आमदार वैभव पिचड यांनी विधानसभेची ही चावी दुसऱ्याच्या हाती जावू दिली नाही. २०१४ च्या निवडणुकीत पिचड यांना ६७ हजार ६९४ मते मिळाली होती. शिवसेनेच्या तळपाडे यांना ४७ हजार ६२४ मते मिळाली. पिचड यांनी विजयश्री खेचून आणली असली, तरी विरोधकांना मिळालेली मते विचार करायला लावणारी होती. शिवाय भाजप व शिवसेनेचा स्वतंत्र उमेदवार असल्याने मतविभागणीही झाली होती.

आगामी निवडणुकीत शिवसेनेचे नेते सतीश भांगरे, मधुकर तळपाडे, मारुती मेंगाळ, तर भाजपकडूनही अशोक भांगरे, डाॅ. किरण लहामटे हे इच्छुक आहेत. युतीकडून एकालाच उमेदवारी मिळणार असल्याने या सर्व इच्छुक नेत्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याची कसोटी युतीच्या नेत्यांमध्ये लागणार आहे. मात्र, भाजप सरकारच्या लाटेत उमेदवार पूर्ण ताकद लावणार असल्याने पिचड यांचीही या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. तथापि, हा गड कोणत्याही परिस्थितीत राखण्याचे आव्हान पिचड यांना पेलावे लागणार आहे.

आदिवासी मते ठरणार निर्णायक
या परिसरातील आदिवासी समाज मोठा असल्याने हे मते निर्णायक ठरणार आहेत. यातील बहुतेक मतदार हा पिचड यांना मानणारा आहे. या शिवाय काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात व पिचड यांच्यातील संबंध चांगले आहेत. त्याचाही फायदा पिचड यांना होऊ शकेल. आगामी काळात काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेले, तरी त्याचा प्रभाव या मतदारसंघावर होण्याची शक्यता नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com