`कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी पवार साहेबांचे मला सदैव प्रोत्साहन'

`कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी पवार साहेबांचे मला सदैव प्रोत्साहन'

राजकारण आणि समाजकारण या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून मनाशी मनाला जोडणारा नेता म्हणजे शरद पवार साहेब. एखाद्या व्यक्तीने विधायक काम सुचविले आणि पवार साहेबांना ते काम योग्य वाटले की ते पूर्णत्वास नेण्याची काम सांगणाऱ्या व्यक्तींपेक्षा पवार साहेबांनाच जास्त तळमळ असते. 

माझ्या कृषी विज्ञान केंद्राच्या मान्यतेचा रिपोर्ट तयार असताना प्रशासकीय यंत्रणेच्या वेळकाढूपणामुळे परवाना मिळत नव्हता. पवार साहेबांना ही अडचण सांगितली अन्‌ साहेब म्हणाले, `संजय चला बसा गाडीत...' संसद भवनातून गाडी ऑफिसकडे निघाली. साहेबांनी लगेच भारतीय अनुसंधान केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून मान्यतेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली. अन्‌ एका तासात मला कृषी विज्ञान केंद्राच्या परवान्याचा ईमेल आला. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी पक्षभेद न करता पवार साहेबांनी मला सदैव प्रोत्साहन दिले. शरद पवार साहेब म्हणजे, क्रिएटिव्ह माइंड, पॉझिटिव्ह अप्रोच अॅण्ड कन्स्ट्रक्‍टिव्ह वर्क. महाराष्ट्रासाठीची त्यांची ही विकासदृष्टी पथदर्शी ठरणार आहे. 

देशाच्या राजकीय पटलावर महाराष्ट्राची मुलूख मैदानी तोफ म्हणजे शरद पवार साहेब. देशात सत्ता कोणत्याही पक्षाची असो. पवार साहेबांचा विरोधी पक्षाप्रमाणेच सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच सन्मान केल्या जातो. शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा सर्वसामान्य जनतेची समस्या, दोन्हींकडे पवार साहेब आत्मीयतेने पाहून ते प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कार्यतत्पर असतात. केंद्रीय कृषी मंत्री असताना पवार साहेबांनी कृषी क्षेत्रात भरीव काम केले. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे जगणे उन्नत होणार नाही. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी अर्थव्यवस्थेत बदल करावा लागेल. परंपरागत शेतीचा त्याग करून तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन उपाय शोधणे आवश्‍यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पवार साहेबांनी ग्रामीण भागात उद्योगनिर्मितीसह वीज, पाणी, रस्ते, आरोग्यसेवा निर्माण कार्यावर अधिक भर दिला. 

आजची राजकीय परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे. मात्र, पवार साहेबांनी विकास कामांमध्ये कधीही राजकारण आणले नाही. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांनी कधीच पक्षभेद केला नाही. माझ्या कृषी विज्ञान केंद्राच्या मान्यतेचा रिपोर्ट तयार होता. मात्र, भारतीय अनुसंधान केंद्रातील काही अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे तो रिपार्टच मिळत नव्हता. संसदेत अधिवेशनाचे कामकाज आटोपल्यावर पवार साहेब ऑफीसला जाण्यासाठी निघाले असता त्यांची भेट झाली. त्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या मान्यतेची अडचण सांगितल्यावर त्यांनी `संजय चला बसा गाडीत' असे म्हटले. आम्ही दोघे गाडीत बसलो आणि साहेबांनी स्वतः भारतीय अनुसंधान केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून फाईल निकाली काढण्याची सुचना केली. आश्‍यर्च म्हणजे मला एका तासातच कृषी विज्ञान केंद्राच्या मान्यतेचा ई मेल आला. अनेक महिन्यांपासून प्रलंबीत असलेले काम पवार साहेबांनी काही तासातच पूर्ण करून दिले. 

पवार साहेबांना भेटण्याचा अनेकदा योग्य आला. मात्र, त्या दिवशीची त्यांची भेट ही माझ्या कायमच स्मरणात राहणारी आहे. मी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा उपाध्यक्ष (कॅबीनेट मंत्री दर्जा) झाल्यावर पवार साहेबांनी स्वत: फोन करून शुभेच्छा दिल्या. या संभाषणातही पवार साहेबांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवित कृषी क्षेत्राला कशी चालना द्यावी यावरच मार्गदर्शन केले. त्यांच्या बोलण्यातील प्रत्येक शब्दात शेतकरी, कष्टकरांबद्दल आत्मियतता जाणवत होती. त्यामुळेच पवार साहेबांना शेतकऱ्यांचा खरा कैवारी म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा या युगपुरुषाला वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 
(शब्दाकंन : श्रीकांत पाचकवडे, अकोला)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com