कृषिमंत्र्यांच्या तालुक्‍यात शेतकऱ्याने केली दगडाची पेरणी ! 

कृषिमंत्र्यांच्या तालुक्‍यात शेतकऱ्याने केली दगडाची पेरणी ! 

खामगाव : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली असून कर्जमाफीची प्रक्रिया होईपर्यंत दहा हजार रुपये देणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. मात्र, शेतकऱ्यांना अजून एक रुपयाही मिळाला नसल्याने राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या बुलडाणा जिल्ह्यात बी-बयाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी पैसे नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी शेतात चक्क "दगडाची पेरणी' करून सरकारचा निषेध केला. 

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याच्या मागणीसाठी रान पेटल्यानंतर शेतकऱ्यांचा असंतोष शांत करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देणार असल्याचे शासनाने जाहीर केले. मात्र, खरीप हंगामाला सुरूवात झाली असतांना बियाणे, खते घेऊन पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

शासनाच्या घोषणेनुसार बॅंकांकडून दहा हजार मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पेरणीची चिंता सतावत आहे. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर लक्ष वेधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्याचे कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या तालुक्‍यातील खुटपूरी येथे अभिनव आंदोलन केले. शेतीची संपूर्ण मशागत झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांजवळ बी बियाणे घेऊन पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याने गोपाल काकडे या शेतकऱ्याच्या शेतात दगड आणि रेतीची पेरणी केली. यामधून जे उगवेल ते सरकारला विकनार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. 

येत्या चार दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पेरणीसाठी पिक कर्ज मिळाले नाही तर बॅंकेवर रुमणे मोर्चा काढणार असल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्‍याम अवथळे यांनी दिला. यावेळी श्रीकृष्ण काकडे, विष्णु जुमळे, मारोती बोचरे, स्वाती काकडे, ममता काकडे, संगीता काकडे, शोभा बाठे, शारदा डवगे, शिला डवगे, पांडुरंग घोडसे, दशरथ घोडसे, सुनील घोरपडे, गजानन गवळी, मोहन अढायके, तुकाराम बोचरे, पांडुरंग काकडे, देवराम घोरपडे, श्रीराम घोरपडे, दीपक अढायके, विक्की बुलबुले, प्रवीण गवळी, प्रशांत बोचरे आदी शेतकरी व महिला उपस्थित होत्या. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com