शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी डॉ. रणजित पाटलांचा पुढाकार 

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी डॉ. रणजित पाटलांचा पुढाकार 

अकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर या माफीसाठी लावलेल्या निकषांमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर मात करत शासनाने जाहीर केल्याप्रमाणे थकबाकीदार शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात अकोला जिल्ह्याने बाजी मारली आहे. खरिप हंगामाच्या पेरणीसाठी पैसा नसलेल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी पुढाकार घेतला असून सोमवार (ता.19) पासून शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रुपयांचे कर्ज वाटपास सुरूवात झाली आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सर्वत्र आंदोलन पेटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकरा जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, ही कर्जमाफी काही निकषांच्या अधिन राहून करण्यात आल्याने शेतकऱ्यांना नव्याने कर्जवाटप करण्यासाठी मोठा विलंब लागणार होता. तोंडावर आलेली खरीप हंगामाची पेरणी लक्षात घेता शेतकऱ्यांना बि-बियाणे व रासायनिक खते घेण्यासाठी निधी उपलब्ध करुन देणे आवश्‍यक होते. त्यासाठी 30 जून रोजी थकबाकीदार असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार रुपये शासन हमीवर तातडीने कर्ज देण्याचा निर्णय शासनाने घेतला. या निर्णयाच्या प्रती दोन दिवसांनंतर राज्यभरातील बॅंकांना पाठविण्यात आल्या. 

तातडीचे कर्जवाटप करताना घालून दिलेले निकष अनेकांना गोंधळात टाकणारे असल्याने या कर्ज वाटपात सध्या कुणीही आघाडी घेतली नव्हती. एकीकडे पेरणी सुरु झालेली असताना अन्‌ दुसरीकडे हा गोंधळ सुरु असल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांची मोठी कुचंबना झाली होती. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी अकोला व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी रविवारी या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत सोमवारपासून जिल्हा बॅंकेतर्फे शेतकऱ्यांना तातडीचे कर्जवाटप करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्‍यक पैशाचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com