अकोला महापालिकेत नगरसेवकांचा करवाढीविरोधात राडा  - akola politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

अकोला महापालिकेत नगरसेवकांचा करवाढीविरोधात राडा 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मे 2017

अकोला महापालिका प्रशासनाने केलेल्या करवाढीविरोधात विरोधी पक्ष कॉंग्रेस, शिवसेना, भारिप बमसंच्या नगरसेवकांनी सोमवार (ता.29) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार राडा केला. सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवित हेच काय तुमचे अच्छे दिन, असा हल्लाबोल करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खुर्च्यांची तोडफोड केली. 

अकोला : महापालिका प्रशासनाने केलेल्या करवाढीविरोधात विरोधी पक्ष कॉंग्रेस, शिवसेना, भारिप बमसंच्या नगरसेवकांनी सोमवार (ता.29) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार राडा केला. सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवित हेच काय तुमचे अच्छे दिन, असा हल्लाबोल करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खुर्च्यांची तोडफोड केली. 

अकोला महापालिका प्रशासनाने शहरातील मालमत्ताधारकांना नुकत्याच कर मूल्यांकनाच्या नोटीस बजावल्या. पंधरा वर्षांनंतर करण्यात आलेली ही करवाढ अन्यायकारक असून एकाच वेळी मालमत्ताधारकांना चार-पाच पटीने वाढीव कर आकारण्यात आल्याने या करवाढीला महापालिकेतील विरोधी पक्ष कॉंग्रेस, शिवसेना, भारिप बमसं आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीव्र विरोध केला आहे. 

अकोलेकरांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेले सत्ताधारी भाजप करवाढ करून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप करीत ही करवाढ रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षांनी रेटून धरली आहे. आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याच मुद्यावर कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण, शिवसेना गटनेता राजेश मिश्रा, भारिप बमसंच्या नगरसेविका धनश्री अभ्यंकर, नगरसेवक मंगेश काळे, बबलू जगताप, शशी चोपडे, पराग कांबळे, मंजुषा शेळके, गजानन चव्हाण आदींनी करवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी सभागृह दणाणून सोडले. 

हातात करवाढ रद्द करण्याच्या मागणीचे पोस्टर घेऊन सभेत सर्वप्रथम करवाढ रद्द करण्याचा ठराव घेण्याच्या मागणी करीत महापौर विजय अग्रवाल यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. सभागृहात वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांना पाचारण करण्यात आल्यावर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची धुसफूस झाली. याच वादात काही जणांनी सभागृहातील खुर्च्यांची तोडफोड केली. पोलिसांनी कॉंग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांना ताब्यात घेत सभागृहाबाहेर नेले. करवाढीच्या मुद्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये पेटलेला हा वाद आता कोणत्या वळणावर जाईल, करवाढ रद्द होईल की नाही? याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख