माजी आमदार सानंदांच्या अटकपूर्व जामिनावर दोन जूनला सुनावणी  - Akola politics | Politics Marathi News - Sarkarnama

माजी आमदार सानंदांच्या अटकपूर्व जामिनावर दोन जूनला सुनावणी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मे 2017

खामगाव येथील शिवाजी वेस भागातील श्री शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व इतरांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर 2 जून रोजी सुनावणी होणार आहे. 

अकोला : खामगाव येथील शिवाजी वेस भागातील श्री शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहारप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व इतरांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर 2 जून रोजी सुनावणी होणार आहे. 

खामगाव येथील शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहारबाबत 23 मे रोजी नगरपरिषदेचे नगर अभियंता निरंजन जोशी यांनी मुख्याधिकारी यांच्यावतीने व त्यांनी दिलेल्या आदेशानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अकरा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याप्रकरणी शिवाजी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष गोकुलचंद सानंदा, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी गुन्हे दाखल होण्यापूर्वी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर दोघांनाही 25 मेपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. या अंतरिम अटकपूर्व जामिनावर 25 मे रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती.

गुन्हे दाखल झाल्यानंतर याप्रकरणी दिगंबर खासणे, महावीर थानवी, कांतीचंद भट्टड यांनी अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी 24 मे रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला असता, हा अर्जही आदेशासाठी 25 मे रोजी ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली असता, गोकुलचंद सानंदा, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, दिगंबर खासणे, महावीर थानवी, कांतीचंद भट्टड यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी 2 जून रोजी न्यायालयाने ठेवली आहे. तर 23 मे रोजी माजी नगराध्यक्ष अशोककुमार सानंदा व सरस्वतीताई खासणे यांनीही अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविला होता. या जामिनावरही सुनावणी झाली असता, या दोघांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी 29 मे रोजी ठेवण्यात आली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख