akola politics | Sarkarnama

अकोला महापालिकेच्या विशेष सभेत कचऱ्यावर राजकारण 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 एप्रिल 2017

अकोल्यातील स्वच्छतेचा अभाव, नाल्यांची अस्वच्छता आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे शहर भकास होत असल्याचा मुद्दा रेटत आक्रमक झालेल्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत महापालिकेची अर्थसंकल्पीय विशेष सभा कचऱ्यावरच गाजवली. 

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "एक कदम स्वच्छता की ओर' हा संदेश दिला. मात्र, अकोला शहरात हे अभियान निव्वळ देखाव्यापुरतेच राबविण्यात आले. स्वच्छतेचा अभाव, नाल्यांची अस्वच्छता आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे शहर भकास होत असल्याचा मुद्दा रेटत आक्रमक झालेल्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत महापालिकेची अर्थसंकल्पीय विशेष सभा कचऱ्यावरच गाजवली. 

विशेष म्हणजे स्वच्छतेच्या प्रश्नावर प्रशासनासोबतच महापौर विजय अग्रवाल यांना कोंडीत पकडण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीही कचऱ्याचे राजकारण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

अकोला महापालिकेचा अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी अर्थसंकल्पीय विशेष सभा शनिवारी घेण्यात आली. या सभेच्या सुरवातीलाच विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी महानगरातील स्वच्छतेचा विषय मार्गी लावण्याची सूचना केली. अस्वच्छता, कचऱ्याचा विषय निघताच सभागृहात उपस्थित शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबतच सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनीही हा विषय रेटून धरला. 

महानगरातील एकही प्रभाग स्वच्छ, सुंदर नसून जिकडे पहाल तिकडे कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. सफाई कर्मचारी दोन तास काम करून निघून जातात, नाल्याची नियमित सफाई होत नसल्याने घाण पाणी रस्त्यावर येऊन साचते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले नसून जनतेच्या रोषाचा नगरसेवकांनाच सामना करावा लागत आहे, असे नगरसेवकांनी सांगितले. 

स्वच्छतेच्या या प्रश्नावर सत्ताधारी भाजपचे गटनेते राहुल देशमुख, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, शिवसेना गटनेते राजेश मिश्रा, मंजूषा शेळके, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उषा विरक आदींनी प्रशासनाला धारेवर धरले. या वेळी महापौर विजय अग्रवाल यांनी प्रभागनिहाय नगरसेवकांच्या समस्या ऐकून घेतल्या. मात्र, प्रशासनाकडून समस्यांवर समाधान न झाल्याने नगरसेवकांनी कचऱ्याच्या मुद्यावरच ही सभा गाजवली. 

आयुक्तांची धडक कारवाई 
कर्तव्यात कसूर करून सभागृहाची दिशाभूल केल्याप्रकरणी मलेरिया विभागाचे पर्यवेक्षक अरुण टापरे यांना निलंबित करण्याचे आदेश आयुक्त अजय लहाने यांनी सभेत दिले. या सोबतच कामचुकारपणा करणाऱ्या आठ सफाई कामगारांची विभागीय चौकशी लावण्यात आल्याचे आयुक्त अजय लहाने यांनी सभेत सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख