akola politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

जनता दरबारात ऊर्जामंत्र्यांचा रुद्रावतार 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

शेतकऱ्यांच्या वीज जोडणीसह ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यास अपयशी ठरलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच भडकले. बुलडाणा येथे आयोजित जनता दरबारात ऊर्जामंत्र्यांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची घाबरगुंडी उडाली.

अकोला : शेतकऱ्यांच्या वीज जोडणीसह ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्यास अपयशी ठरलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच भडकले. बुलडाणा येथे आयोजित जनता दरबारात ऊर्जामंत्र्यांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची घाबरगुंडी उडाली.

या वेळी शेतकऱ्यांना वीज जोडणी न देण्यासह कामात दिरंगाई करणाऱ्या अभियंत्यांचा निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यासह आठ अभियंत्यांची वेतनवाढ रोखण्याची धडाकेबाज कारवाई ऊर्जामंत्र्यांनी केली. 
महावितरण व महापारेषणच्या बुलडाणा येथे पूर्ण झालेल्या विविध विकास कामाचे मंगळवारी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण व मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. 

या कार्यक्रमानंतर ग्राहकांच्या समस्या ऐकून घेण्याकरिता ऊर्जामंत्र्यांचा जनता दरबार भरविण्यात आला. या वेळी व्यासपीठावर आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार आकाश फुंडकर, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, आमदार संजय रायमुलकर, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, महावितरणचे क्षेत्रीय संचालक प्रसाद रेशमे, मुख्य अभियंता अरविंद भादीकर यांची उपस्थिती होती. 

या वेळी ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांच्या समस्या ऐकून घेत त्यावर तत्काळ संबंधित अभियंत्यांना जाब विचारला. शेतकरी अभिमन्यू लहाने यांना शेतातील कृषी पंपाची वीज जोडणी न देणाऱ्या उपअभियंता चव्हाण यांच्या तीन वेतनवाढ रोखण्याचा आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिला. बुलडाणा शहरातील एका घरावरून वीज वाहिनी गेली आहे. 

यामुळे अपघातग्रस्त झालेल्या घरमालकाची साधी पाहणीही न करता त्याला कोणताही मोबदला देण्यात आला नसल्याचा प्रकार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी तत्काळ बुलडाण्याचे कार्यकारी अभियंता विजय जिजीलवार यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले. 

लोणारचे उपअभियंता खोकडे मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार आमदार संजय रायमुलकर यांनी केल्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी खोडके यांना चांगलेच धारेवर धरले. खोडके तुम्ही कोठे राहता, कुणाच्या घरात राहता अशा प्रश्नांची सरबत्ती ऊर्जामंत्र्यांनी करीत त्यांच्या तीन वेतनवाढी रोखण्याचे आदेश दिले. 

जनता दरबारात ऊर्जामंत्र्यांच्या रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. शेतकरी, ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवून महावितरणचा ढेपाळलेला कारभार त्वरित न सुधारल्यास कारवाई करण्याचा इशारा ऊर्जामंत्र्यांनी दिल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख