akola politics | Sarkarnama

तूर खरेदीत व्यापाऱ्यांसह अधिकारीही चौकशीच्या फेऱ्यात 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करून तीच तूर नाफेडच्या खरेदी केंद्रावर विक्री करणारे व्यापारी, दलालांसह खरेदी समितीही चौकशीच्या फेऱ्यात आली आहे. या प्रकरणात भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांच्या तक्रारीवरून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिल्याने अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

अकोला : हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करून तीच तूर नाफेडच्या खरेदी केंद्रावर विक्री करणारे व्यापारी, दलालांसह खरेदी समितीही चौकशीच्या फेऱ्यात आली आहे. या प्रकरणात भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांच्या तक्रारीवरून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिल्याने अधिकाऱ्यांसह व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

राज्यात तूर खरेदीचा प्रश्न पेटला आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन वाढले आहे. नाफेड तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी दोन-तीन महिन्यांपासून तूर विक्रीसाठी आणली. मात्र, बारदाण्याचा अभाव, खरेदी प्रक्रियेसाठी होणारा विलंब आणी शासनाने दिलेल्या अल्प मुदतीमुळे शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर नाफेड केंद्रावर पडून आहे. शासनाकडून खरेदीसंदर्भात होत असलेल्या अडवणुकीला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावात तूर विक्री केली. मात्र, हीच तूर बाजारात कमी दराने खरेदी करून नाफेडच्या बाजार समितीतील केंद्रावर विक्री करण्याचा सपाटा व्यापारी, दलाल, बाजार समिती व्यवस्थापनाने लावला. 

शेतकरी हिताच्या गप्पा करणाऱ्या बाजार समिती व्यवस्थापनाने सुद्धा व्यापाऱ्यांकडून कमी दराने शेतकऱ्यांची तूर खरेदी करून नाफेड केंद्रावर त्याची विक्री होत असताना व्यापाऱ्यांविरुद्ध कोणतीच ठोस कारवाई न करता बाजार समिती व्यवस्थापन मूग गिळून गप्प बसले होते. शेतकऱ्यांची आर्थिक लूट करून त्यांच्याच हक्काच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या त्रिकुटाविरुद्ध भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. 

या गंभीर प्रकरणाची तक्रार प्रकाश मानकर यांनी पुराव्यासह सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे केली असून, कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची यादी शासनाकडे सादर केली आहे. सहकारमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिल्याने आता व्यापारी, दलाल, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख