akola politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

तूर खरेदीच्या प्रश्नावर शिवसेना उतरली रस्त्यावर 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 एप्रिल 2017

तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अडवणुकीविरोधात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीमध्ये आंदोलन करून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र व राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडून मित्र पक्ष असलेल्या भाजपला कोंडीत पकडत सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

अकोला : तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अडवणुकीविरोधात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बाजार समितीमध्ये आंदोलन करून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र व राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेकडून मित्र पक्ष असलेल्या भाजपला कोंडीत पकडत सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

यंदा तूर उत्पादन वाढणार असल्याची सरकारला पूर्वकल्पना असतानाही, 40 लाख क्विंटल तूर आयात करण्यात आली. आयात धोरणाचा मोठा प्रभाव धान्य बाजारपेठेत दिसून आला. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची तूर कवडीमोल दराने खरेदीचा सपाटा लावला. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली होती. सर्वत्र शेतकऱ्यांकडून शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मागणी करण्यात आली. आवक वाढत असल्याने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात मोजक्‍या ठिकाणी नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्यावरही कागदपत्रांच्या जाचक अटी, महिना-महिना मोजमापासाठी प्रतीक्षा, निम्मे दिवस केंद्र बंद, बारदाना संपला, मनुष्यबळाचा अभाव, साठवणुकीची समस्या इत्यादी कारणांनी शेतकऱ्यांना हैराण करून सोडले. लागवड खर्चतरी मिळेल या अपेक्षेने शेतकरी हा सर्व त्रास सहन करून नाफेड केंद्राबाहेर अनेक दिवस प्रतीक्षेत होते. 

15 मार्च रोजी या केंद्रांची मुदत संपली. परंतु, लाखो क्विंटल तूर अजूनही विक्रीसाठी प्रतीक्षेत असल्याने, आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. शनिवारी ही मुदतही संपली, त्यामुळे शेतकऱ्यांची खरेदी केंद्रावर हजारो क्विंटल तूर पडून आहे. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, माजी आमदार संजय गावंडे, निवासी उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, प्रदीप गुरूखुद्दे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व शिवसैनिकांनी बाजार समितीत सोमवारी आंदोलन केले. बाजार समिती कार्यालयाचे बंद प्रवेशद्वार उघडून शिवसेना पदाधिकारी थेट आत घुसले आणि बाजार समितीचे सभापती, अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाब विचारला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख