akola politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मंत्र्यांच्या घरात ट्रॅक्‍टरभर तूर टाकणार : कडू 

श्रीकांत पाचकवडे 
सोमवार, 24 एप्रिल 2017

नाफेड तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या अडवणुकीविरोधात प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी एल्गार पुकारला आहे. शासनाने तूर खरेदी तातडीने सुरू केली नाही तर सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांच्या घरात ट्रॅक्‍टरभर तूर टाकण्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला आहे.

अकोला : नाफेड तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या अडवणुकीविरोधात प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी एल्गार पुकारला आहे. शासनाने तूर खरेदी तातडीने सुरू केली नाही तर सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांच्या घरात ट्रॅक्‍टरभर तूर टाकण्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला आहे. त्यामुळे तूर खरेदीचा प्रश्न अधिक पेटणार असल्याने सरकारच्या अडचणी वाढणार आहेत. 

आठ दिवसांच्या नाममात्र मुदतवाढीनंतर नाफेड तूर खरेदी केंद्र शनिवारी बंद करण्यात आले. अजूनही शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर विक्री व्हायची आहे. व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होत असल्याने शेतकरी नाफेड केंद्रावर तूर विक्रीस आणत होते. मात्र, त्यांच्याकडे आता पर्याय उरला नसल्याने तूर विक्रीसाठी व्यापाऱ्यांच्याच दारात जावे लागणार आहे. व्यापाऱ्यांकडून मनमानी भाव देत मोठ्या प्रमाणात लूट होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. शेतकऱ्यांची दोन-तीन महिन्यांपासून बाजार समित्यांमध्ये तूर पडून आहे. मात्र, ती मोजायला त्यांना दोन-दोन महिने लागतात. 

आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची अडवणूक शासनकर्त्यांनी सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर "सीएम टू पीएम' आसूड यात्रा काढणारे आमदार बच्चू कडू यांनी तूर खरेदीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरले आहे. शासनाचे धोरण शेतकरी विरोधी असल्याचे म्हणत शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या सरकारमधील सर्व मंत्र्यांच्या घरात ट्रॅक्‍टरभर तूर टाकण्याचा इशारा आमदार कडू यांनी दिला आहे. विशेष म्हणजे शेतकरी हिताच्या गप्पा करणाऱ्या कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी राजीनामा देण्याची मागणीही आमदार कडू यांनी केली आहे. आमदार कडू यांच्या या इशाऱ्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ झाली असून तूर खरेदीचा प्रश्न गाजणार आहे. 

मोदीजी शेतकऱ्यांची "मन की बात' सुनो 
डिजिटल इंडिया, शायनिंग इंडियाचा डिंडोरा पिटणाऱ्या भाजप सरकारने शेतकऱ्यांचे "बुरे दिन' आणले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ "मन की बात' करतात. मात्र, त्यांना शेतकऱ्यांची "मन की बात' अद्यापही कळलेली नाही. त्यामुळे मोदींनी आधी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकावे, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख