akola politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीवरून उठले वादळ 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 एप्रिल 2017

उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव प्राप्त करणारे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या बदलीवरून अकोल्यात वादळ उठले आहे. काही सामाजिक संघटनांनी बदली रद्द करण्याची मागणी रेटून धरली असली तरी जी. श्रीकांत यांची आजवरची जिल्ह्यातील कामगिरी म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याची जोरदार टीका सोशल मिडीयावर होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बदली चर्चेचा विषय ठरली आहे. 

अकोला : उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव प्राप्त करणारे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या बदलीवरून अकोल्यात वादळ उठले आहे. काही सामाजिक संघटनांनी बदली रद्द करण्याची मागणी रेटून धरली असली तरी जी. श्रीकांत यांची आजवरची जिल्ह्यातील कामगिरी म्हणजे निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याची जोरदार टीका सोशल मिडीयावर होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बदली चर्चेचा विषय ठरली आहे. 

गत दोन वर्षांपूर्वी अकोला जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारणारे जी. श्रीकांत यांची शासनाने नुकतीच नांदेड येथे बदली केली. बदलीची माहिती सोशल मिडीयावर वाऱ्यासारखी पसरल्यानंतर काही संघटनांनी जी. श्रीकांत यांची बदली रद्द करण्यासाठी वातावरण निर्मिती सुरू केली, तर काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आजवरच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते निव्वळ प्रसिद्धीसाठी हपापलेले अधिकारी असल्याची टीका सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. नर्सेसच्या कार्यक्रमात स्टेजवर नाचणे, 45 रुपयाचे देशी दारूचे क्वार्टर 50 रुपयात विकले जाते म्हणून स्वतः ग्राहक बनून दुकानात जाऊन कारवाई करणे, वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या पालकाला मुलीचा अपघात झाला म्हणून फोन करणे, सार्वजनिक ठिकाणी स्वयंपाक सुरू असताना पोळ्या लाटणे अशा अनेक पब्लिसिटी स्टंटचा समाचार घेणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी काही नागरिकांनी त्यांच्याच शासकीय बंगल्यासमोर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचाही सोशल मिडीयावर जोरदार समाचार घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर विक्रीअभावी पडून असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी कोणी पुढाकार घेईल काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख