akola politics | Sarkarnama

अकोल्याचे पालकमंत्री थेट जनता दरबारात 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 एप्रिल 2017

प्रशासनातील दफ्तरदिरंगाई दूर करून जनतेला लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी व जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जनता दरबार आयोजित केला आहे. 

अकोला : शासन, प्रशासनस्तरामधील "दप्तर दिरंगाई' हा अलिखित नियमच असल्याचे बोलले जाते. निवेदन, तक्रारींवर कारवाई होत नसल्याने तक्रारकर्ते शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवुन थकतो. शेवटी ती फाइल तशीच धुळखात पडून राहत असल्याचे अनेक प्रकरणे आहेत. प्रशासनातील ही दफ्तरदिरंगाई दूर करून जनतेला लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी व जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जनता दरबार आयोजित केला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रशासन गतिमान करण्यावर भर आहे. नागरिकांच्या तक्रारी, समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर आटोकाट प्रयत्न होत असताना नागरिकांच्या तक्रारी, समस्या सोडविण्यास लालफितशाही आडवी येते. जिल्ह्यातील काही निष्क्रिय अधिकारी वेळकाढूपणा करीत असल्याने जनतेमध्ये शासनाविषयी रोष निर्माण होत आहे. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी समाधान शिबिराच्या माध्यमातून जनता दरबार भरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

पातुर व बाळापूर तालुक्‍यातील नागरिकांच्या तहसील कार्यालयात तक्रारी स्वीकारून त्यावर 29 एप्रिल रोजी पालकमंत्री डॉ. पाटील समाधान शिबिरात या समस्यांचे निवारण करणार आहेत. नागरिकांच्या समस्यांवर पालकमंत्र्यांकडून थेट उपाययोजना होणार असल्याचे सांगत या जनता दरबाराचे पालकमंत्र्यांच्या समर्थकांकडून जोरदार मार्केटिंग करण्यात येत असले तरी या शिबिरातून जनतेचे समाधान होईल की नागरिकांना पुन्हा दप्तर दिरंगाईचा सामना करावा लागेल, अशी चर्चा या शिबिराच्या निमित्याने नागरिकांमध्ये सुरू आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख