akola politics | Sarkarnama

अकोल्यातील ग्रामपंचायती कर्जमुक्तीसाठी करणार ठराव 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 एप्रिल 2017

आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासाठी शेतकरी जागर मंचने रणशिंग फुंकले आहे. कर्जमुक्तीच्या आंदोलनात जिल्ह्यातील सरपंचांना सहभागी करून घेत महाराष्ट्र दिनी एक मे रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती कर्जमुक्तीचा एकमताने ठराव घेणार आहेत. 

अकोला : आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासाठी शेतकरी जागर मंचने रणशिंग फुंकले आहे. कर्जमुक्तीच्या आंदोलनात जिल्ह्यातील सरपंचांना सहभागी करून घेत महाराष्ट्र दिनी एक मे रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती कर्जमुक्तीचा एकमताने ठराव घेणार आहेत. 

निसर्गाची अवकृपा, शासन व प्रशासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून शेतात पिकविलेले उत्पादन चांगले झाले असले तरी, लागवड खर्च निघेल एवढाही भाव शेतमालास देण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत तीनशे पटीने तुरीचे पेरणी क्षेत्र यंदा वाढल्याचे माहीत असतानासुद्धा सरकारने चाळीस लाख क्विंटल तूर अठरा हजार रुपये क्विंटल दराने आयात केली. चौदा मार्च रोजी झालेल्या मिल असोसिएशनच्या बैठकीतसुद्धा अजून पन्नास लाख क्विंटल तूर आयातीसाठी मंजुरात दिली. येथे मात्र, शेतकऱ्यांना नाफेड केंद्रावरसुद्धा हमीभावाने तूर विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागली. याचा अर्थ सरकारचा शेतकरी संपविण्याचा मानस असल्याचा आरोप शेतकरी जागर मंचने केला आहे. 

सरकार केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवीत आहे. सरकारने फस्त केलेले शेतकऱ्यांचे अब्जो रुपये त्यांना संपूर्ण कर्जमुक्तीच्या स्वरूपात परत करावे, या मागणीसह शेतकरी जागर मंच एक मे रोजी कर्जमुक्तीसाठीचे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी जागर मंच व जिल्ह्यातील सरपंचाच्या संयुक्त झालेल्या बैठकीत रविवारी घेण्यात आला. या बैठकीला शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, मनोज तायडे, जगदीश मुरुमकार, राजू मंगळे, काशिराम साबळे, कृष्णा अंधारे, दिवाकर देशमुख, शिवाजी म्हैसने, गजानन वारकरी, चंद्रकांत मोरे, सम्राट डोगरदिवे, विनोद थुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने एकमताने संपूर्ण कर्जमुक्तीचा ठराव पारीत करून सरकारकडे पाठविणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख