akola politics | Sarkarnama

अकोल्यात "स्वीकृत' सदस्यपदासाठी इच्छुकांचा जीव टांगणीला 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 एप्रिल 2017

अकोला महापालिकेच्या लोकशाही आघाडीतून भारिप-बमसं बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याने स्वीकृत सदस्यपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या इच्छुक पदाधिकाऱ्याचा जीव टांगणीला पडला आहे. विशेष म्हणजे या पदासाठी काही नगरसेवकाना "ऍडव्हान्स'ही दिला आहे. त्यामुळे आघाडी फुटली तर "तेलही गेले तूपही गेले' असे म्हणण्याची वेळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांवर येणार आहे. 

अकोला : महापालिकेच्या लोकशाही आघाडीतून भारिप-बमसं बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याने स्वीकृत सदस्यपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या इच्छुक पदाधिकाऱ्याचा जीव टांगणीला पडला आहे. विशेष म्हणजे या पदासाठी काही नगरसेवकाना "ऍडव्हान्स'ही दिला आहे. त्यामुळे आघाडी फुटली तर "तेलही गेले तूपही गेले' असे म्हणण्याची वेळ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुक पदाधिकाऱ्यांवर येणार आहे. 

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी विविध पक्षातील पंधरा नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढली. निवडणुकीत काळात राष्ट्रवादी जोरदार मुसंडी मारेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. महानगरातील मतदारांनी राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना नाकारले. त्यामुळे अवघ्या पाच नगरसेवकांवरच राष्ट्रवादी कॉंग्रेसला समाधान मानावे लागले. 

महापालिकेत झालेल्या पराभवानंतर स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य पदासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी फिल्डिंग लावली. राष्ट्रवादीचे पाच, भारिप-बमसंचे तीन आणि एमआयएमचा एक अशा नऊ नगरसेवकांची राष्ट्रवादीच्या पुढाकाराने लोकशाही आघाडी स्थापन झाली. आघाडी स्थापन करताना स्थायी समितीसह विविध महत्त्वपूर्ण समित्यांवर भारिप बमसंचा एक-एक सदस्य देण्याचे ठरले होते. 

स्थायी समिती सदस्य पदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणीत लोकशाही आघाडीच्या गटनेत्यांनी भारिप बमसंच्या नगरसेविका डॉ. धनश्री अभ्यंकर यांचे सभागृहात नावच घेतले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने दगा केल्याचा आरोप करीत डॉ. अभ्यंकर यांनी आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे सूतोवाच केले होते. 

राष्ट्रवादीने केलेल्या हा प्रकार भारिपच्या नगरसेवकांनी भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत पोचविल्यावर त्यांनी आघाडीतून बाहेर पडण्यास हिरवी झेंडा दाखवल्याचे समजते. त्यामुळे आघाडीतून भारिप-बमसं बाहेर पडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याची धाकधूक वाढली आहे. या पदाधिकाऱ्याने काही नगरसेवकांना ऍडव्हान्स दिल्याची चर्चा आहे. आघाडी फुटली तर स्वीकृत नगरसेवक पदही हातातून जाईल आणि ऍडव्हान्सही परत मिळण्याची शक्‍यता कमीच असल्याने "तेलही गेले तूपही गेले...' म्हणण्याची वेळ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर येणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख