akola politics | Sarkarnama

अकोल्यात आमदारांच्या दत्तक गावात भाजपचा पराभव 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 22 एप्रिल 2017

अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची विजयाची घोडदौड सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकळे यांनी दत्तक घेतलेल्या दानापुर जिल्हा परिषद सर्कलमध्येच भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. 

अकोला : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची विजयाची घोडदौड सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकळे यांनी दत्तक घेतलेल्या दानापुर जिल्हा परिषद सर्कलमध्येच भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. 

उमेदवार निवडताना स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच आमदारांनी दिलेल्या उमेदवाराला मतदारांप्रमाणेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही नाकारले. त्यामुळे पराभवाचे खापर आपसूकच आमदार भारसाकळेंवर फुटले आहे. 

जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. भाजपचे खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात झालेल्या या निवडणुकांमध्ये पक्षाला मिळालेल्या यशामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, जिल्हा परिषद दानापूर सर्कलच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला पराभव अकोट विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेसाठी धडा शिकविणारा ठरला आहे. 

दर्यापूर निवासी आमदार प्रकाश भारसाकळे यांना पक्षाने गत विधानसभा निवडणुकीत अकोट मतदारसंघात तिकीट दिले. या निवडणुकीत भारसाकळेंचा दणक्‍यात विजयही झाला. मात्र, अकोट मतदारसंघातील पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांचा संवादाचा अभाव असल्याची ओरड कार्यकर्त्यांकडून होत असते. 

आमदार दत्तक योजनेअंतर्गत आमदार भारसाकळे यांनी दानापूर हे गाव दत्तक घेतले आहे. मात्र, परिसरातील समस्या सोडविण्यास आमदार अपयशी ठरत असल्याने दानापूर सर्कलच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला नाकारले. विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात न घेताच आमदारांनी उमेदवार लादल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही निवडणुकीत काम दाखविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख