akola politics | Sarkarnama

गुलाबराव गावंडे पुन्हा आक्रमक 

श्रीकांत पाचकवडे : सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

आक्रमक बाणा आणि धुव्वाधॉंर भाषण शैलीमुळे आपले वेगळे अस्तित्व तयार करून राजकीय मैदान गाजविणारे माजी मंत्री गुलाबराव गावंडे पुन्हा आक्रमक होत आहेत. 

अकोला : आक्रमक बाणा आणि धुव्वाधॉंर भाषण शैलीमुळे आपले वेगळे अस्तित्व तयार करून राजकीय मैदान गाजविणारे माजी मंत्री गुलाबराव गावंडे पुन्हा आक्रमक होत आहेत. 

शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने वऱ्हाडाच्या राजकारणात आपला दबदबा कायम राखत कर्जमुक्तीचे आंदोलन ग्रामीण भागात अधिक तीव्र करण्यासाठी गुलाबरावांनी कंबर कसली आहे. 
जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्यांचे वाढते सत्र अद्यापही थांबलेले नाही. मात्र, शेतकरी हिताच्या गप्पा करणारे भाजप-शिवसेना युतीचे फडणवीस सरकार अद्यापही कुंभकर्णाच्या झोपेतच आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा सज्जड इशारा देत कर्जमुक्तीसाठी राज्यातील विरोधी पक्षांनी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सुरू केलेले आंदोलन ग्रामीण भागात अधिक तीव्र करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी कंबर कसली आहे. 

शिवसेनेत असताना गुलाबराव गावंडे यांची राजकीय कारकीर्द चांगली गाजली होती. मात्र, पक्षांतर्गत वाढलेल्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून गुलाबरावांनी महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ हातात बांधले. राष्ट्रवादीत गेल्यानंतर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला करावा लागलेल्या पराभवाच्या सामन्यामुळे गुलाबराव काही दिवस शांत होते. मात्र, शेतकरी कर्जमुक्तीच्या आंदोलनाच्या निमित्ताने वऱ्हाडाच्या राजकारणात गुलाबराव गावंडेंचा आक्रमकपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. सावकारग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाचा एल्गार पुकारणाऱ्या गुलाबरावांनी आता शेतकरी कर्जमुक्तीसाठी ग्रामीण भाग पिंजून काढत कर्जमुक्तीचे आंदोलन गावोगावी पोचविणे सुरू केले आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली असताना शेतकरी हिताच्या गप्पा करणारे भाजप-शिवसेना युतीचे फडणवीस सरकार अद्यापही कुंभकर्णाप्रमाणे झोपतेच आहे. आता बसं झाले. फडणवीस सरकार जागे व्हा, असा इशारा देत गुलाबरावांनी कर्जमुक्तीसाठी कंबर कसल्याने वऱ्हाडात हे आंदोलन अधिक तीव्र होत असल्याने सरकारसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख