akola politics | Sarkarnama

शेतकरी कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचे "रुमणे आंदोलन' 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा डाव सत्ताधारी शिवसेनेकडूनच खेळला जात आहे. विरोधी पक्षांनी कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेत थेट सहभागी न होता, अकोला जिल्ह्यात शिवसेना शेतकरी कर्जमुक्तीसाठी "रूमणे आंदोलन' करणार आहे.

अकोला : शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा डाव सत्ताधारी शिवसेनेकडूनच खेळला जात आहे. विरोधी पक्षांनी कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेत थेट सहभागी न होता, अकोला जिल्ह्यात शिवसेना शेतकरी कर्जमुक्तीसाठी "रूमणे आंदोलन' करणार आहे.

विशेष म्हणजे या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी गावपातळीवर जाऊन आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी कंबर कसल्याने हे आंदोलन लक्षवेधी ठरणार आहे. 

विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात दंड थोपटणाऱ्या भाजप-शिवसेनेतील कलगीतुरा अद्यापही संपलेला नाही. केंद्र व राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या या दोन्ही पक्षामध्ये अंतर्गत कुरघोडीचे राजकारण उफाळून आले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या भरीव यशानंतर मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली. फडणविसांनी अत्यंत पद्धतशीरपणे सेनेला कमी महत्त्वाची खाती देऊन झुलविणे सुरू केले. त्यानंतर भाजप-सेना नेत्यांमधील वाद वाढत आहे. 

नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही भाजप-शिवसेना स्वबळावर लढली. त्यातही भाजप वरचढ ठरला आहे. प्रदेश पातळीवर सुरू असलेला हा नेत्यांमधील कलगीतुरा गावपातळीपर्यंत येऊन पोचला आहे. त्यातूनच भाजप अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेकडून रूमणे आंदोलनाचा डाव खेळला जात आहे. शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यात विरोधी पक्षांकडून संघर्ष यात्रा काढण्यात आली. या यात्रेत थेट सहभागी न होता, कर्जमुक्तीच्या मुद्यावरच रूमणे आंदोलन करण्याची तयारी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सुरू केली आहे. 

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या ठरलेल्या कर्जमुक्तीच्या विषयावर आंदोलनाचा एल्गार पुकारण्यासोबतच जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्याची खेळी सुद्धा शिवसेनेकडून खेळल्या जात आहे. यासाठी पश्‍चिम विदर्भ संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनात आमदार गोपीकिशन बाजोरिया, सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, निवासी उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर आदी पदाधिकाऱ्यांकडून आंदोलनाची रणनीती आखण्यात येत आहे. 

विधानसभेची तयारी 
शिवसेनेच्या रूमणे आंदोलनाची सुरवात बाळापूर तालुक्‍यातून करण्यात येणार आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी या मतदारसंघातून यापूर्वी विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यामुळे मतदार संघात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने या आंदोलनासाठी बाळापूरची निवड करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख