akola politics | Sarkarnama

अकोल्याच्या युवा सेना जिल्हाप्रमुखपदासाठी अनेकांची "फिल्डिंग' 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

शिवसेनेची यंग ब्रिगेड समजल्या जाणाऱ्या युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. या पदासाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांचे सुपुत्र कुणाल पिंजरकर यांच्यासह काही जुन्या आणि नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या गॉडफादरच्या माध्यमातून फिल्डिंग लावली आहे. 

अकोला : शिवसेनेची यंग ब्रिगेड समजल्या जाणाऱ्या युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखपदासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू झाली आहे. या पदासाठी शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांचे सुपुत्र कुणाल पिंजरकर यांच्यासह काही जुन्या आणि नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या गॉडफादरच्या माध्यमातून फिल्डिंग लावली आहे. 

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीआधी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी सेनेला "जय महाराष्ट्र' करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. वडिलांनी सेना सोडल्याने युवा सेना जिल्हा प्रमुख असलेले गुलाबरावांचे सुपुत्र संग्राम गावंडे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. तेव्हापासून जिल्हाप्रमुख पद रिक्तच आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत या पदावर नियुक्तीबाबत फारसे लक्ष दिले गेले नाही. आता मात्र, युवा सेनेत जिल्हाप्रमुख पदासाठी जुन्या आणि नव्या दमाच्या शिवसैनिकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. 

शिवसेनेचे पश्‍चिम विदर्भ सहसंपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांचा मुलगा कुणाल पिंजरकर, शहरप्रमुख सागर भारूका, सुरेंद्र विसपुते, योगेश बुंदेले आदींनी या पदावर दावा केला असून आपापल्या गॉडफादरच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी फिल्डिंग लावण्यात आली आहे. 

गत काळातील अनुभव पाहता जिल्ह्यात शिवसेनेच्या नेतृत्व बदलानंतर सेनेला महापालिका, नगरपालिका निवडणुकीत फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात सेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी युवासैनिकांची जिल्हाभर फौज तयार करणे आवश्‍यक आहे. जिल्हाप्रमुख पदावर विराजमान होणारा पदाधिकारी खमक्‍या असला तर त्या माध्यमातून पक्षाला अधिक बळकटी मिळू शकते. त्यादृष्टीने पक्षपातळीवरसुद्धा जिल्हाप्रमुखपदावर दमदार नेतृत्व देण्यावर भर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख