akola politics | Sarkarnama

अकोल्यात पालकमंत्र्यांच्या सभेला खासदार-आमदारांनी फिरवली पाठ 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 एप्रिल 2017

अकोला जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये सुरू असलेले वर्चस्वाचे राजकारण थांबायचे नाव घेत नाही. त्यातूनच पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बोलावलेल्या खरीप हंगाम पूर्व तयारी सभेला खासदार संजय धोत्रे यांच्यासह आमदार गोवर्धन शर्मा आणि आमदार रणधीर सावरकर यांनी पाठ फिरविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

अकोला : जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये सुरू असलेले वर्चस्वाचे राजकारण थांबायचे नाव घेत नाही. त्यातूनच पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बोलावलेल्या खरीप हंगाम पूर्व तयारी सभेला खासदार संजय धोत्रे यांच्यासह आमदार गोवर्धन शर्मा आणि आमदार रणधीर सावरकर यांनी पाठ फिरविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

शिस्तप्रिय आणि एकसंध समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील भाजपमध्ये गत काही वर्षांपासून कुरघोडीचे राजकारण उफाळून आले आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड असलेले खासदार संजय धोत्रे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यात गत काही महिन्यांपासून शीतयुद्ध सुरू आहे. पक्षाच्या सभा असो की शासकीय कार्यक्रम, एकमेकांचे उणे-दुणे काढण्यात दोन्ही गटांचे नेते कोणतीच कसर ठेवत नाहीत. त्यामुळेच एकसंध समजल्या जाणाऱ्या भाजपची जिल्ह्यात दोन शकले पडली असून, दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करीत आहेत. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्ह्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी बैठक घेतली. मात्र, या बैठकीला खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांनी पाठ फिरविली. 

पालकमंत्री गटाचे समजल्या जाणारे भाजपचे आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यासह शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया, भारिप बमसंचे आमदार बळिराम सिरस्कार बैठकीला उपस्थित होते. एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभा आणि विधानसभेत तळमळीने मांडणाऱ्या खासदार, आमदारांची अनुपस्थिती अनेकांना खटली. खासदार धोत्रे आणि आमदार शर्मा, आमदार सावरकर बैठकीला न येण्यामागे महापालिका निवडणुकीत डॉ. पाटील आणि खासदार धोत्रे गटात झालेला वाद असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख