Akola politics | Sarkarnama

अकोला महापालिका विरोधी पक्षनेतापदाच्या शर्यतीत शिवसेनेची उडी

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 29 मार्च 2017

अकोला महापालिकेत विरोधी पक्षनेता पदावर संख्याबळानुसार काँग्रेसने दावा केल्यानंतर या शर्यतीत शिवसेना सुद्धा उतरली आहे.

अकोला : महापालिकेत विरोधी पक्षनेता पदावर संख्याबळानुसार काँग्रेसने दावा केल्यानंतर या शर्यतीत शिवसेना सुद्धा उतरली आहे. काँग्रेसला चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या लोकशाही आघाडीचे समर्थन मिळवित विरोधी पक्षनेता पद पदरात पाडून घेण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू झाल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. 

अकोला महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुक सर्वाधिक अठ्ठेचाळीस नगरसेवक विजयी करत भाजपने महापालिकेची सत्ता एकहाती ताब्यात घेतली आहे. अपक्ष नगरसेविका माधुरी मेश्राम यांनी सुद्धा भाजपला समर्थन दिल्याने भाजपचे संख्याबळ एकोणपन्नास झाले आहे. भाजप पाठोपाठ महापालिकेत काँग्रेसचे तेरा नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे संख्याबळानुसार काँग्रेसने विरोधी पक्षनेता पदावर दावा केला असून साजीद खान पठाण यांच्या नावाची शिफारस करत तसे पत्र महापौर विजय अग्रवाल यांना दिले आहे. महापालिकेतील राजकारण पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच छत्तीसचे आकडे राहिले आहेत. 

निवडणुकीपुर्वीपासून काँग्रेसला शह देण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी कंबर कसली होती. त्यातूनच महापालिका निवडणुकीत काँग्रेसशी असलेली आघाडी तोडत राष्ट्रवादी स्वबळावर लढली. नाही म्हटले तरी राष्ट्रवादीच्या या भुमीकेचा फटका काँग्रेसला अनेक प्रभागात बसला. त्यामुळे गत निवडणुकीत अठरा नगरसेवक असणाऱ्या काँग्रेसला यंदा तेरा नगरसेवकांवरच समाधान मानावे लागले. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीत असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचा फायदा महापालिकेच्या विरोधी पक्षनेता पद निवडीत उचलण्याची खेळी शिवसेनेकडून आखल्या जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या लोकशाही आघाडीचा पाठिंबा घेऊन शिवसेनेकडून विरोधी पक्ष नेता पदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने शिवसेनेचे नगरसेवक राजेश मिश्रा यांच्याकडून माेर्चेबांधणी करण्यात येत आहे.. महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असूनही काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रणनिती आखण्यात येत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स