akola politics | Sarkarnama

शेतकरी कर्जमुक्तीसाठी महिलाशक्ती उतरणार रस्त्यावर 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 29 मार्च 2017

मार्चपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व अकोला जिल्हा संपूर्ण दारूमुक्ती करावा अन्यथा एप्रिलनंतर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी बचाओ आंदोलनाच्या महिला समितीने दिला आहे.

अकोला : राज्यात शेतकरी कर्ज मुक्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आता महिलाशक्ती सुद्धा उतरली आहे. मार्चपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व अकोला जिल्हा संपूर्ण दारूमुक्ती करावा अन्यथा एप्रिलनंतर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी बचाओ आंदोलनाच्या महिला समितीने दिला आहे. शेतकरी कर्जमुक्तीच्या लढ्यात महिलाशक्ती उतरल्याने सरकारसमोरच्या अडचणी वाढणार आहेत. 

गत काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सततची नापिकी आणि बॅंक, सावकारांचे डोक्‍यावर असलेले कर्ज फेडण्याच्या विवंचनेत कुटुंबाचे पालन-पोषण करणे कठीण जात असल्याने हवालदिल झालेल्या शेकडो शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनाही अपुऱ्या पडत असल्याने शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावी, अशी मागणी राजकीय पक्षांसह शेतकरी, सामाजिक संघटनांकडून होत आहे. 

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या या लढ्यात आता महिलाशक्ती उतरली आहे. शेतकरी बचाओ आंदोलन महिला समितीच्या वतीने अकोल्यात मेळावा घेण्यात आला. या वेळी मार्चपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, अकोला जिल्ह्यात संपूर्ण दारूमुक्ती करावी, शेतीसाठी सरकारने तगाई द्यावी, शेगाव तीर्थक्षेत्र दारूमुक्त करावे, दारू पिणाऱ्यांना व्यसनमुक्त करण्यास प्रत्येक तालुक्‍यात व्यसनमुक्ती केंद्र काढण्याची मागणी समितीच्या डॉ. सीमा तायडे यांनी केली. शासनाने या मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास महिलाशक्ती व युवाशक्तीच्या वतीने एक एप्रिलनंतर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुढीपाडव्यापासून डॉ. पंजाबराव देशमुख जयंती (दहा एप्रिल) पर्यंत जिल्ह्यात शेतकरी महिलांचे तालुका मेळावे, संघटना बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स