Akola politics | Sarkarnama

"सीएम'साहेब शब्द पाळतील का? 

श्रीकांत पाचकवडे : सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 29 मार्च 2017

अकोला महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अठ्ठेचाळीस नगरसेवक विजयी करणाऱ्या भाजपने नवा इतिहास रचला आहे. निवडणूक काळात मुख्यमंत्र्यांनी चांगली कामगिरी करणाऱ्या आमदार व मंत्र्यांची दखल घेतल्या जाईल, असे शब्द दिले होते. आता मुख्यमंत्री त्यांचा शब्द पाळून महापालिकेची एकहाती सत्ता मिळवून देणारे आमदार रणधीर सावरकर यांना लाल दिव्याची भेट देतील का? असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. 

अकोला : महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अठ्ठेचाळीस नगरसेवक विजयी करणाऱ्या भाजपने नवा इतिहास रचला आहे. निवडणूक काळात मुख्यमंत्र्यांनी चांगली कामगिरी करणाऱ्या आमदार व मंत्र्यांची दखल घेतल्या जाईल, असे शब्द दिले होते. आता मुख्यमंत्री त्यांचा शब्द पाळून महापालिकेची एकहाती सत्ता मिळवून देणारे आमदार रणधीर सावरकर यांना लाल दिव्याची भेट देतील का? असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. 

महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. निवडणूक काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली कामगिरी करणाऱ्या आमदार व मंत्र्यांची दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते. अकोला महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे युती-आघाड्यांच्या टेकूवर सत्ता स्थापन करण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत भाजपचे खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांच्या नियोजनबद्ध आखणीमुळे भाजपने ऐंशीपैकी अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवीत महापालिकेची सत्ता एकहाती ताब्यात घेतली आहे. 

विशेष म्हणजे शिवसेना, भारिप बमसंचे प्राबल्य असलेल्या अकोला पूर्व मतदारसंघातील बत्तीसपैकी अठ्ठावीस जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी करण्यात आमदार रणधीर सावरकर यांना यश आले आहे. मतदारसंघात केलेली विकासकामे आणि तळागाळातील जनतेच्या प्रश्नासाठी अभ्यासू आणि आक्रमकपणे प्रश्न रेटून धरत आवश्‍यक उपाययोजना करण्याची कला आमदार सावरकर यांना अवगत असल्याने मतदारांनी भाजपला भरभरून मतांचे दान केले आहे. 

खासदार संजय धोत्रे यांच्या तालमीत राजकारणाचे धडे गिरविणारे आमदार रणधीर सावरकर यांची जिल्ह्यातील पक्ष संघटनेवर मजबूत पकड आहे. मतदारसंघासह जिल्ह्यातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी सावरकर यांची सातत्याने धडपड सुरू असते. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सावरकर हे अभ्यासू आमदार असल्याचे अनेकदा जाहीर सभेत सांगून त्यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी आमदार सावरकर यांना लाल दिव्याची गाडी मिळेल का, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख