Akola politics | Sarkarnama

राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषद पुन्हा आक्रमक 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 मार्च 2017

भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशची एकहाती सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अयोध्येतील राम मंदिर निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राम मंदिर निर्मितीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपसांत चर्चा करून मार्ग काढण्याचे दिलेले निर्देश लक्षात घेता विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील रामाचे मंदिर निर्माण करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अकोला : भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशची एकहाती सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अयोध्येतील राम मंदिर निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राम मंदिर निर्मितीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपसांत चर्चा करून मार्ग काढण्याचे दिलेले निर्देश लक्षात घेता विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील रामाचे मंदिर निर्माण करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंदिराच्या निर्मितीसाठी सरकारने तत्काळ पावले उचलावी, अशी मागणी करीत यासाठी देशभर संकल्प सभा घेण्याचा निर्णय विश्व हिंदू परिषदेने घेतला आहे. 

केंद्रात व उत्तरप्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे श्री रामचंद्रांचे मंदिर त्यांच्या जन्मभूमीवर उभारण्यासाठी सरकारने तत्काळ पावले उचलावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली असल्याचे अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत विहिंपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाने त्यांच्या नियोजन पत्रकात नमूूद केल्याप्रमाणे, आता श्री रामचंद्रभूमीस्थानी भव्य मंदिर निर्मितीची जबाबदारी वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपसांत चर्चा करून मार्ग काढण्याचे निर्देशही नुकतेच दिले होते. सॅटेलाईटद्वारे निर्धारित ठिकाणची छायाचित्रे घेतली असून, पूर्वातन विभागानेसुद्धा तेथे सर्वप्रथम मंदिरच उभारलेले असल्याचे सांगितले. त्यामुळे आता सर्व बाजू स्पष्ट असून, तत्काळ मंदिराची निर्मिती व्हायला पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने सरकारकडे केली आहे. विशेष म्हणजे मंदिर निर्मितीचे सर्व अधिकार श्रीराम जन्मभूमी न्यासालाच मिळावे, विश्व हिंदू परिषदेने मंदिराच्या खांबाचे डिझाईन रेखाटले असून, त्यानुसारच बांधकाम व्हावे, भारतात कोठेही बाबरी मशिदीची निर्मिती होऊ नये, ज्या धरतीवर सरदार पटेल यांनी सोमनाथ मंदिर निर्माण केले, त्याच धरतीवर श्रीराम मंदिर निर्माण करावे अशा मागण्या विश्व हिंदू परिषदेचे अजय निलादावार, अरुण नेटके, राहुल राठी, प्रकाश घोगलिया, गणेश काटकर, सूरज भगेवार, डॉ.प्रवीण चौहान, संजय रोहणकर, गोपाल नागपुरे, प्रताप विरवाणी, श्रीकांत गावंडे, रवी देशमाने, चंदेश वाघमारे, विजय डहाके, श्रीकांत दाहे आदींनी केली आहे. 

श्री राम मंदिर निर्मितीच्या चळवळीची व बलिदानाची देशभरातील सर्व वयोगटात माहिती व्हावी. याकरिता गुडीपाडव्यापासून ते हनुमान जयंतीपर्यंत तालुका केंद्रांवर संकल्प सभा आयोजित करण्यात येणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख