Akola politics | Sarkarnama

"स्वीकृत नगरसेवक'च्या पंगतीत भाजपचे महानगराध्यक्ष 

श्रीकांत पाचकवडे : सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 27 मार्च 2017

महापालिका निवडणुकीच्या धुमशानानंतर आता स्वीकृत सदस्य पदासाठी विविध पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महापालिकेची एकहाती सत्ता ताब्यात घेणाऱ्या भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची सर्वाधिक संख्या आहे. 

अकोला : महापालिका निवडणुकीच्या धुमशानानंतर आता स्वीकृत सदस्य पदासाठी विविध पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. महापालिकेची एकहाती सत्ता ताब्यात घेणाऱ्या भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची सर्वाधिक संख्या आहे. 

पक्षांतर्गत इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू असताना स्वीकृत नगरसेवक पदाच्या पंगतीत भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील हेही बसण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे स्वीकृत सदस्य पदासाठी भाजपमधील दोन नेत्यांच्या गटा-तटाचे राजकारण उफाळून येत असल्याने पक्षांतर्गत वातावरण तापले आहे. 

अकोला महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर आणि महानगराध्यक्ष किशोर मांगटे-पाटील यांच्या नियोजनबद्ध आखणीमुळे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वाधिक अठ्ठेचाळीस नगरसेवक विजयी करत भाजपने महापालिकेची एकहाती सत्ता ताब्यात घेतली. या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी न मिळालेले किंवा पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महापालिकेत स्वीकृत सदस्यपदी वर्णी लावण्यात येणार आहे. 

महापालिकेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकांची तीन पदे येणार आहेत. या पदासाठी गिरीश गोखले, हरिभाऊ काळे, माजी नगरसेवक विजय जयपिल्ले, गिरीश जोशी, माजी नगराध्यक्ष नानूभाई पटेल, शीतल रूपारेल यांची नावे चर्चेत होती. त्यात भर म्हणून भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांचेही नाव चर्चेत आल्याने पक्षांतर्गत चुरस वाढली आहे. भाजपमधील अंतर्गत राजकारण पाहता खासदार संजय धोत्रे गटाचा महापालिकेच्या राजकारणावर वरचष्मा राहिला आहे. त्यांचे पक्षांतर्गत प्रतीस्पर्धी समजल्या जाणारे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील गटाकडूनही स्वीकृत सदस्य पदावर आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी, यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिफारस करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

पक्षांतर्गत गटा-तटाच्या राजकारणात स्वीकृत सदस्य पदावर कोणाची वर्णी लागेल, हे गुढीपाडव्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत इच्छुक पदाधिकारी आपापल्या परीने फिल्डिंग लावून महापालिकेच्या सभागृहात बॅक डोअर एन्ट्री करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख