'रावसाहेब दानवे, नको रे बाबा !'

'रावसाहेब दानवे, नको रे बाबा !'

अकोला : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना साले म्हणून संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेणाऱ्या रावसाहेब दानवे यांना शिवार संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपली ईमेज सांभळत शेतकऱ्यांचा नसता रोष ओढवून घेण्यापेक्षा दानवेंपासून भाजपचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी सध्यातरी चार हात लांबच राहत आहेत. 

अकोला जिल्ह्यात रावसाहेबांच्या उपस्थितीत आयोजित शिवार संवाद कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य करणारे रावसाहेब दानवे अकोल्यात आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. त्यामुळे सेनेच्या आक्रमक भुमिकेमुळे रावसाहेबांचा दौरा रद्द करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

केंद्र व राज्यात सत्ताधारी भाजप सरकारच्या कामगिरीवर जनसामान्याचा रोष वाढत आहे. सर्वसामान्य जनतेला "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून सत्तेवर बसलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची निराशा केल्याचा हल्लाबोल विरोधी पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेनेकडूनही करण्यात येत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीची शेतकरी संघर्ष यात्रा आणि शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानातून भाजपवर टिकेची झोड उठविण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा वाढता रोष कमी करण्यासाठी भाजपकडून शिवार संवाद यात्रा राबविण्यात येत आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्याप्रती शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेता भाजपचे लोकप्रतिनिधी प्रदेशाध्यक्षांपासून सध्यातरी चार हात लांबच राहणे पसंत करीत आहेत. 

अकोला जिल्ह्यात माना येथे खासदार रावसाहेब दानवेंच्या उपस्थितीत रविवार (ता.28) शिवार संवाद आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा दौरा रद्द करण्यात आला आहे. तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे भाजपचे स्थानिक पदाधिकारी सांगत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या नुकसानाची प्रदेशाध्यक्ष असलेल्या खासदार दानवेंकडून पाहणी करता आली नसती काय? या नुकसानाबाबत शेतकऱ्यांचे सांत्वन करता आले नसते का? असे अनेक यानिमित्याने प्रश्न उपस्थित होत आहे. तूर खरेदीच्या मुद्यावर प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल वापरलेले अपशब्दाचा निषेध करीत रावसाहेब दानवे अकोला जिल्ह्यात आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी दिला होता. 

रावसाहेब शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी जिल्ह्यात आल्यास शिवसेनेकडून संभाव्य होणारे आंदोलन भाजपच्या स्थानिक नेत्यांना परवडणारे नव्हते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज पक्षाच्या स्थानिक खासदार, आमदारांची असलेली प्रतिमा यानिमित्याने डागाळत शिवसेनेकडून शेतकऱ्यांची सहानुभूती कॅश करण्याचा प्रयत्न झाला असता. हे सर्व टाळण्यासाठी अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचे कारण देत भाजप पदाधिकाऱ्यांकडून सोईस्करपणे रावसाहेब दानवेंचा दौरा रद्द करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

लवकरच शिवार संवाद घेऊ 
तेजराव थोरात (जिल्हाध्यक्ष भाजप अकोला) :
मुर्तिजापूर तालुक्‍यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने प्रदेशाध्यक्षांच्या दौरा पुढे ढकलण्याची विनंती भाजपचे आमदार हरिश पिंपळे यांनी केली होती. त्यानूसार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा करून दौरा पुढे ढकलला. लवकरच शिवार संवाद यात्रेत रावसाहेब दानवे शेतकऱ्यांशी संवाद साधतील. 

येऊ तर द्या तोंडाला काळे फासू 
नितीन देशमुख (जिल्हा प्रमुख शिवसेना अकोला) :
शेतकऱ्यांना साले म्हणणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे जिल्ह्यात आल्यास शिवसेनेकडून त्यांच्या तोंडाला काळे फासल्या जाईल. शिवसेनेच्या इशाऱ्यामुळेच दानवेंचा दौरा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय-हक्कासाठी शिवसेनेने एल्गार पुकारला असून कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय सेना शांत बसणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com