मुली बेपत्ता प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली अकोल्याच्या जिल्हा पोलिस प्रमुखाची बदली - Akola Police SP Transferred | Politics Marathi News - Sarkarnama

मुली बेपत्ता प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केली अकोल्याच्या जिल्हा पोलिस प्रमुखाची बदली

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

याचिकेवर सुनावणी करताना, दोन महिन्यात अकोला जिल्ह्यातून 35 महिला, युवती बेपत्ता असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. न्यायालयाने पोलिसांना बेपत्ता मुलीला हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही.त्यामुळे न्यायालयाने पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांना समन्स बजावले होते. त्यानंतरही पोलिस अधीक्षक गावकर न्यायालयात हजर झाले नाहीत

अकोला : जिल्ह्यात 15 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत 35 मुली बेपत्ता झाल्या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करीत तडकाफडकी बदली केली. विशेष म्हणजे या बदलीसोबतच सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांच्यासह तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक श्रीमती कराळे यांचे निलंबन केल्याचे आदेश शुक्रवारी (ता.28) जिल्ह्यात धडकले. विशेष म्हणजे अमोघ गावकर यांनी आठ महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारला होता हे विशेष.

शहरात राहणाऱ्या एका पालकाच्या तक्रारीनुसार, त्याची अल्पवयीन मुलीला पवन प्रमोद नगरे, अलका नगरे यांनी फूस लावून पळवून नेले. या प्रकरणात संबधित पालकाने सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रार नोंदविल्यावरही मुलीचा शोध घेतला नाही. तसेच पोलिसांना आरोपींची नावे दिल्यानंतरही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. पोलिस अधीक्षक, ठाणेदारांकडे सुद्धा सातत्याने तक्रार केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कंटाळून पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली होती.

याचिकेवर सुनावणी करताना, दोन महिन्यात अकोला जिल्ह्यातून 35 महिला, युवती बेपत्ता असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. न्यायालयाने पोलिसांना बेपत्ता मुलीला हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही.त्यामुळे न्यायालयाने पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांना समन्स बजावले होते. त्यानंतरही पोलिस अधीक्षक गावकर न्यायालयात हजर झाले नाहीत. एकंदरीतच प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकाने केला होता. याबाबत प्रसारमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मीडियाने वृत्त प्रसारित केले. त्यानंतर या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदलीचे आदेश दिले. तसेच सिव्हिल लाईनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, महिला तपास अधिकारी पीएसआय श्रीमती कराळे यांनाही निलंबित करण्याचे निर्देश दिले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख