अकोला महापालिका चोरांच्या ताब्यात : बाळासाहेब आंबेडकर 

अकोला महापालिका चोरांच्या ताब्यात : बाळासाहेब आंबेडकर 

अकोला : अकोला महापालिका ही सध्या चोरांच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळेच अवाजवी करवाढ करून अकोलेकरांची आर्थिक लूट सत्ताधारी भाजपकडून सुरू असल्याची प्रखर टिका भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली.

महापालिका प्रशासनाने केलेल्या करवाढीविरोधात बुधवार (ता.28) भारिप बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, माजी राज्यमंत्री डॉ. दशरथ भांडे, भारिप बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशिराम साबळे, महापालिकेतील गटनेता डॉ. धनश्री अभ्यंकर, नगरसेवक बबलू जगताप, नगरसेविका किरण बोराखडे, प्रदीप वानखडे, प्रतिभा अवचार, अॅड. संतोष राहाटे, सम्राट सुरवाडे, जीवन डिगे, विकास सदांशिव, प्रसन्नजीत गवई, मनोहर पंजवानी  आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

या वेळी बाळासाहेबांनी आयुक्त अजय लहाने यांच्या कक्षात जाऊन जुन्या पद्धतीनेच कराचा भरणा केला. त्यानंतर महापालिकेबाहेर उपस्थित जनसमुदायास संबोधित करताना आंबेडकरांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली. जनतेला "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजपने जनतेची घोर निराशा केली आहे. अवाजवी करवाढ करून आधीच आर्थिक संकटात असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. मी जुन्याच पद्धतीने कराचा भरणा केला असून नागरिकांनीही जुनाच कर भरावा, असे आवाहन डॉ. आंबेडकर यांनी केले. 

कर घेण्यासाठी अधिकारीच नाही 
बाळासाहेब आंबेडकर कर भरण्यासाठी कर विभागात दाखल झाले. मात्र, करविभागाचे अधिकारी पारतवार कक्षात उपस्थित नव्हते. त्यामुळे बराच वेळ बाळासाहेबांना तेथे ताटकळत बसावे लागले. अखेर गटनेत्या डॉ. धनश्री अभ्यंकर यांनी आयुक्तांना फोन करून याबाबतची माहिती दिल्यावर बाळासाहेबांना माझ्याच कक्षात घेऊन या असे त्यांनी सांगितल्यावर बाळासाहेब आयुक्तांच्या कक्षात दाखल झाले. 

करवाढीचा टक्कल करून निषेध 
महापालिकेने केलेल्या करवाढीचा भारिप बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी टक्कल करून निषेध केला. नगरसेवक बबलु जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोरच टक्कल करून सत्ताधारी भाजपच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 

पोलिसांचा तगडा बंदोबस्त 
भारिप बमसंच्या मोर्चाच्या पार्श्वभुमिवर पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला. होता. अकोल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश माने पाटील, वाहतुक शाखेचे पोलिस निरिक्षक विलास पाटील, कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे, पोलिस निरिक्षक शैलेष सपकाळ आदी अधिकाऱ्यांसह पोलिसांचा ताफा नियंत्रणासाठी उपस्थित होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com