Akola Municipal corporation election | Sarkarnama

पराभूत मात्तबरांची "स्वीकृत'साठी फिल्डिंग 

श्रीकांत पाचकवडे : सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

महापालिकेच्या रणसंग्रामात एकहाती सत्ता घेणाऱ्या भाजपसह कॉंग्रेस आणि शिवसेनेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी काही पराभूत मात्तबरांसह पक्षातील पदाधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. 

अकोला : महापालिकेच्या रणसंग्रामात एकहाती सत्ता घेणाऱ्या भाजपसह कॉंग्रेस आणि शिवसेनेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी काही पराभूत मात्तबरांसह पक्षातील पदाधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. 

महापालिकेच्या सभागृहात "इन डोअर' जमले नसले तरी "बॅक डोअर'ने एन्ट्री करण्याचा चंग काही पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्य पदावर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली असून आपापल्या गॉड फादरकडे त्यासाठी फिल्डिंग लावण्यात येत आहे. 

अकोला महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विरोधकांना जोरदार हादरा देत अठ्ठेचाळीस नगरसेवकांनी विजयी पताका फडकविली. महापालिकेच्या इतिहासात एखाद्या पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुमत मिळणे हा करिष्मा खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर आणि महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या नियोजनबद्ध आखणीमुळेच शक्‍य झाले. त्या तुलनेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भारिप बमसंचे पदाधिकारी अंतर्गत धुसफूस आणि नियोजनात कमी पडल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेत भाजपची बहुमतावर सत्ता आल्यावर प्रशासनाने सोमवारी महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विशेष सभेचा प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे पाठविला आहे. महापौर, उपमहापौर पदाची माळ कोणच्या गळ्यात पडते, यावर भाजपमध्ये फिल्डिंग लावणे सुरू असतानाच स्वीकृत नगरसेवक पदावर वर्णी लावण्यासाठी सुद्धा पक्षात चुरस वाढली आहे. 

महापालिकेच्या संख्याबळानुसार पाच स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये भाजप तीन, कॉंग्रेस एक आणि शिवसेनेच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक पद येण्याची शक्‍यता आहे. पक्षातील काही पराभूत मात्तबर उमेदवार आणि पक्षाने तिकीट न दिलेल्या इच्छुकांची या पदावर वर्णी लावण्यात येणार आहे. यासाठी संख्याबळ जुळवाजुळवीच्या प्रयत्नात अनेकजण आहेत. या निवडणुकीत भाजप प्रमाणेच कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या काही मात्तबर नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे इन डोअर जमले नसले तरी बॅक डोअरने सभागृहात एन्ट्री करण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे. पक्षीय राजकारण पाहता सभागृहात पक्षाची बाजू सांभाळणारा अनुभवी आणि सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणे आवश्‍यक असून, त्यादृष्टीनेच कॉंग्रेस, शिवसेनेकडून चाचपणी करण्यात येणार आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख