Akola municipal corporation election | Sarkarnama

भारिप बमसंचा "सोशल इंजिनिअरिंग'चा फंडा फेल 

श्रीकांत पाचकवडे : सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

सर्व जाती-धर्माला सोबत घेत वऱ्हाडातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेत सत्ता गाजविणाऱ्या भारिप बमसंचा "सोशल इंजिनिअरिंग'चा फंडा महापालिकेच्या रणसंग्रामात फेल ठरला आहे. 

अकोला : सर्व जाती-धर्माला सोबत घेत वऱ्हाडातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेत सत्ता गाजविणाऱ्या भारिप बमसंचा "सोशल इंजिनिअरिंग'चा फंडा महापालिकेच्या रणसंग्रामात फेल ठरला आहे. 

उमेदवारी वाटपात झालेल्या घोळानंतर पक्षात उफाळून आलेली बंडखोरी शमविण्यात भारिप बमसंचे स्थानिक पदाधिकारी अपयशी ठरले. त्यामुळे गत निवडणुकीत सात नगरसेवकांचे संख्याबळ घसरून अवघ्या तीन नगरसेवकांवरच पक्षाला समाधान मानावे लागले. पक्षाच्या सुमार कामगिरीचे आता ऑडिट होत असले, तरी महापालिकेतील हे अपयश भारिप बमसंला भविष्यातील राजकारणासाठी धोक्‍याची घंटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

बहुजन, मागासवर्गीयांच्या चळवळीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित करणारा भारिप बमसंच्या अकोला पॅटर्नची वाट चळवळीचे मूळ केंद्र असलेल्या अकोल्यातच बिकट झाली आहे. नगरपालिका निवडणुकांच्या निकालानुसार वाशीम, बुलडाणा जिल्ह्यात मुसंडी मारणाऱ्या भारिप बमसंने पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या अकोला शहरात मात्र, केवळ आठ नगरसेवकांवरच समाधान मानावे लागले होते. नगरपालिका निवडणुकीतील अपयशाची कारणमीमांसा शोधल्यानंतर महापालिकेत भारिप काही तरी चमत्कार करेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात होता. त्यासाठी डावे राजकीय पक्ष आणि सामाजिक आर्थिक प्रश्नांसाठी लढणाऱ्या संघटनांना सोबत घेऊन पक्षाने स्वबळावर लढत महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुद्धा केली होती. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर भारिपच्या वाट्याला आलेल्या जागा पाहता पक्षातंर्गत पदाधिकाऱ्यांची धुसफूस आणि उमेदवारी वाटपानंतर झालेली बंडखोरी रोखण्यासाठी केलेले प्रयत्न सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विशेष म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचा फंडा वापरण्यात माहीर असलेल्या भारिप बमसंने महापालिका निवडणुकीत जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि पक्षाच्या काही वजनदार पदाधिकाऱ्यांकडे प्रभागाची जबाबदारी दिली होती. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकुंद भिरड, माजी आमदार हरिदास भदे, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, आसिफ खान, प्रा. प्रसन्नजित गवई यांची निवडणूक निरीक्षण समिती गठित करण्यात आली होती. तसेच सामाजिक समीकरण लक्षात घेता जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे यांच्याकडे कुणबी बहुल भागात प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तर उपाध्यक्ष जमीर उल्ला खान यांना अल्पसंख्याक बहुल भागात प्रचार करण्यास सांगण्यात आले होते. तसेच सभापती देवकाबाई पातोंडसह इतरही सभापतींना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या प्रचारातून कोणताही लाभ झाला नसल्याने निवडणूक उपसमितीच्या कार्यपद्धतीवरच आता प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. नगरपालिकेच्या निवडणुकीत भारिपला आलेले अपयश महापालिकेत भरून निघेल, असे वाटत असले तरी पक्षाचे सात वरून अवघ्या तीन नगरसेवकांवर आलेले संख्याबळ भारिप बमसंच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी धोक्‍याची घंटा ठरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख