Akola municipal corporation | Sarkarnama

अकोल्यातील हद्दवाढीतील गावांच्या विकासाचे नव्या महापौरांपुढे आव्हान

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 मार्च 2017

शिवसेना आणि भारिप बमसंचे प्राबल्य असलेल्या हद्दवाढीतील चोवीस गावांत भाजपने जोरात मुसंडी मारली. हद्दवाढीने प्रभावित वीस जागांपैकी सोळा जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे या गावांच्या परिसराच्या विकास हे नवनिर्वाचित महापौरांपुढील सर्वांत मोठे आव्हान राहील.

अकोला : गत पंधरा वर्षांनंतर महापालिकेची झालेली हद्दवाढ कुणाच्या पथ्यावर पडणार हा निवडणुकीच्या काळात सर्वांच्याच चर्चेचा विषय होता. शिवसेना आणि भारिप बमसंचे प्राबल्य असलेल्या हद्दवाढीतील चोवीस गावांत भाजपने जोरात मुसंडी मारली. हद्दवाढीने प्रभावित वीस जागांपैकी सोळा जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून आलेत. त्यामुळे या गावांच्या परिसराच्या विकास हे नवनिर्वाचित महापौरांपुढील सर्वांत मोठे आव्हान राहील. मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या परिसरात विकासाची गंगा पोचविण्यासाठी नव्या महापौरांना भगीरथ व्हावे लागणार आहे.
 
अकोला महापालिकेत ऐंशीपैकी अठ्ठेचाळीस जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळविली. महापौर आणि उपमहापौरपदही त्यांच्याचकडे आहे. पुढे स्थायी समिती सभापतिपदही त्यांच्याचकडे येईल. त्यामुळे निर्णय घेताना कोणतीही आडकाठी आता सत्ताधारी भाजपला राहणार नाही. त्यामुळे विकास झाला नाही म्हणून कोणतेही कारण सांगण्यासाठी शिल्लक राहिले नाही. अकोला शहराच्या विकासाबाबत भाजपचेच लोकप्रतिनिधी वारंवार विविध व्यासपीठांवरून शंख्य फोडत आले आहेत. तेव्हा केंद्रात, राज्यात आणि महापालिकेतही सत्ता नसल्याचे कारण होते. आता तेही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे महापौरांना विकास हा करून दाखवावाच लागेल. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासोबतच ठोस विकासाची कामे करून दाखविण्याचे आव्हान त्यांना येणाऱ्या काळात पेलावे लागेल. यात सर्वांत मोठे आव्हान त्यांच्यापुढे असेल ते वर्षांनुवर्षांपासून विकासापासून वंचित राहिलेल्या नवीन वस्त्या व ग्रामपंचायतच्या हद्दीतील परिसर. हद्दवाढीने महापालिकेच्या क्षेत्रात आलेल्या या परिसराचे पालकत्वच महापौरांकडे आले आहे. 

विशेष म्हणजे निवडणुकीत काळात महापालिकेची एकहाती सत्ता दिल्यास हद्दवाढीतील गावांचा सर्वांगीण विकासाचे स्वप्न पूर्ण करू, अशी आश्वासने भाजपच्या खासदार, आमदारांनी दिली होती. निवडणुकीपूर्वीच त्यादृष्टीने पावले टाकत हद्दवाढीतील गावांच्या मूलभूत सुविधांचा मास्टर प्लॅन तयार करून शासनाकडे पाठपुरावाही सुरू केला होता. भाजपच्या विकासाच्या आश्‍वासनाला प्रतिसाद देत मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या पदरात भरभरून मते टाकल्यामुळे विकासाची गंगा या परिसरापर्यंत घेऊन जाणारा भगीरथ महापौर विजय अग्रवाल यांना व्हावे लागणार आहे. या परिसरातील रस्ते, पथदिवे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, सांडपाणी व्यवस्थापन आणि महापालिकेतर्फे पुरविल्या जाणाऱ्या सोयीसुविधा येथील नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख