अकोला स्थायी समितीसाठी नगरसेवकांची मोर्चेबांधणी 

अकोला महापालिकेत एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजपसह विरोधी पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भारिपबमसं, एमआयएममध्ये आता स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
akola-mahapalika-final
akola-mahapalika-final

अकोला : महापालिकेत एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजपसह विरोधी पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भारिपबमसं, एमआयएममध्ये आता स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. 

सोळा सदस्यांच्या या समितीतील सदस्यांची निवड महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ व तरुण नगरसेवकांनी आपल्या गॉड फादर फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीत सर्वाधिक भाजपचे दहा सदस्यांची वर्णी लागणार असल्याने पक्षांतर्गत चढाओढ वाढली आहे. 

अकोला महापालिकेच्या रणसंग्रामात भाजपने सर्वाधिक अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवीत सत्ता काबीज केली आहे. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसला चारीमुंड्या चित करत महापौर आणि उपमहापौरपदवर अनुक्रमे विजय अग्रवाल आणि वैशाली शेळके विजयी झाले. नवनिर्वाचीत महापौर, उपमहापौरांनी पदग्रहण केल्यानंतर आता भाजपमधील जुन्या, नव्या नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेच्या या निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक तरुण नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यातील बहुतांश नगरसेवक खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर गटातील असल्याने अनेकांनी स्थायी समिती सभापती पदावर वर्णी लागावी यासाठी आग्रह सुरू आहे. 

दुसरीकडे सदस्य म्हणून समितीमध्ये स्थान मिळावे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक आणि नगरसेवकांसह प्रथमच नगरसेवक झालेल्यांनीही नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मात्र, महापौर, उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यात खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा आणि आमदार रणधीर सावरकर यांनी भाषणातून काही नगरसेवकांच्या निवडणूक काळातील वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या नगरसेवकांना स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणूनही जागा मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. यात काही ज्येष्ठ नगरसेवकांचे पत्ते कट होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

सोळा सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक दहा सदस्य येण्याची शक्‍यता आहे. त्यापाठोपाठ कॉंग्रेसचे तीन, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक आणि अपक्ष, एमआयएम आणि भारिप-बमसं मिळून एक सदस्य समितीवर निवडल्या जाण्याची शक्‍यता आहे. सत्ताधाऱ्याप्रमाणेच विरोधी पक्षातही स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असल्याने महापालिकेचे राजकारण तापले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com