राज ठाकरे चालतात, तर प्रकाश आंबेडकर का नकोत? ‘कासोधा’ आयोजकांना भारिप-बमसंचा प्रश्न

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी कापूस, सोयाबीन, धान परिषदेचे आयोजन येत्या 23 ऑक्टोबर रोजी अकोल्यात करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच या परिषदेला राजकीय रंग चढू लागले आहेत.
राज ठाकरे चालतात, तर प्रकाश आंबेडकर का नकोत? ‘कासोधा’ आयोजकांना भारिप-बमसंचा प्रश्न

अकोला : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी कापूस, सोयाबीन, धान परिषदेचे आयोजन येत्या 23 ऑक्टोबर रोजी अकोल्यात करण्यात येणार आहे. त्यापूर्वीच या परिषदेला राजकीय रंग चढू लागले आहेत. 

यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांची या परिषदेला उपस्थिती राहणार असल्याने काँग्रेस नेते या परिषदेतून अंग काढून घेण्याची शक्यता आहे. परिषदेशी जोडलेल्या भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनाही या परिषदेला आमंत्रित करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे आयोजनापूर्वीच ही परिषद चर्चेत आली आहे.
   
गतवर्षी अकोल्यात आयोजित ‘कासोधा’ परिषदेच्या माध्यमातून यशवंत सिन्हा यांनी सत्ताधारी भाजपविरोधात दंड थोपाटले होते. अकोल्यात शेतकऱ्यांसाठी उपोषण करून त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष कापूस, सोयाबीन, धान उत्पादकांसोबतच शेतकऱ्यांच्या संपूर्ण समस्यांकडे वेधले होते. त्यामुळे ‘कासोधा’ परिषद संपूर्ण देशभर गाजली. या परिषदेला आता राजकीय वलय प्राप्त झाले आहे. परिणामी यावर्षी दुसरी ‘कासोधा’ परिषद आयोजनापूर्वीच चर्चेत आली आहे. 

परिषदेच्या निमित्ताने अकोल्यात दिवाळीपूर्वीच राजकीय आतषबाजी करण्याची तयारी सुरू झाली असून, त्याचा आवाज मुंबई आणि दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच्या कानापर्यंत कसा जाईल, याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हा आवाज तेथपर्यंत पोचण्यापूर्वीच ‘कासोधा’तील नेत्यांमध्ये व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या नेत्यांच्या नावावरून राजकीय फटाकेबाजी सुरू झाली आहे.

भाजपमधील असंतुष्ट यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे. योगायोग म्हणजे त्याच दिवशी 23 ऑक्टोबरला मनसे प्रमुख राज ठाकरेही अकोल्यात आहेत. त्यांनीही या परिषदेला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामाजिक प्रश्‍नांवर उहापोह करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या ‘कासोधा’ परिषदेच्या व्यासपीठाला राजकीय रंग प्राप्त झाले. परिणामी एकीकडे काँग्रेसचे नेते या परिषदेपासून लांब राहण्याची शक्यता आहे.  

दुसरीकडे राज ठाकरे ‘कासोधा’च्या व्यासपीठावर चालत असतील तर अॅड. बाळासाहेब आंबेडकर का नकोत? असा आग्रह या परिषदेशी जुडलेल्या स्थानिक भारिप-बमसंच्या नेत्यांनी धरला आहे. त्यामुळे या परिषदेच्या आयोजक नेत्यांपुढे एक नवाच पेच उभा राहतो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com