Akola election | Sarkarnama

आमदार रणधीर सावरकरांची रणनीती यशस्वी 

श्रीकांत पाचकवडे : सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

आमदार रणधीर सावरकर हे अभ्यासू आमदार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत अनेकदा बोलले. मतदारसंघातील समस्या, विकास कामासंदर्भात त्यांच्यातील अभ्यासू नेतृत्व अनेकदा पहावयास मिळाले. महापालिकेच्या निवडणुकीचे त्यांनी केलेले ग्राउंड लेव्हलवरील प्लॅनिंग आणि मुत्सद्दी रणनितीमुळे भाजपला भरीव यश मिळाले आहे. 

अकोला : नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्ष आप-आपले प्रभुत्व सिद्ध करण्याच्या धडपडीत होता. परंतु आमदार रणधीर सावरकरांचे कुशल नेतृत्व आणि प्रत्यक्ष जनसंपर्कामुळे विजयश्री खेचून आणण्याचे कसब राजकीय पंडितांनाही अवाक करणारे ठरले. भारिप बमसं आणि शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या अकोला पूर्व मतदारसंघातील बत्तीसपैकी अठ्ठावीस जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी करीत आमदार सावरकरांनी या दोन्ही पक्षांना जोरदार हादरा देत मतदारसंघावरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालानंतर आता भारिप बमसं आणि शिवसेनेच्या आजी-माजी आमदारांवर आत्मपरीक्षणाची वेळ आणली आहे. 

अकोला महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजप, शिवसेना आणि भारिप बमसंच्या आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नुकत्याच झालेल्या हद्दवाढीत भारिप बमसं आणि शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या चोवीस गावांचा महापालिकेत समावेश झाला. या परिसरात या दोन्ही पक्षांची भरीव कामगिरी होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला जात होता. मात्र, गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि भारिप बमसंचे आमदार हरिदास भदे यांच्याशी काट्याची टक्कर देत मतदारसंघ काबीज करणारे भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी महापालिका निवडणुकीतही आपला करिष्मा दाखविला आहे. 

हद्दवाढीत समाविष्ट असलेल्या बत्तीसपैकी अठ्ठावीस जागांवर भाजपचे उमेदवार जिंकून आले असून अनेक प्रभागात तर चारही उमेदवारांचे पॅनेल विजयी करण्यात आमदार सावरकरांना यश मिळाले आहे. मतदारसंघात पक्ष, जात-पात न पाहता सर्वांना सोबत घेत गत दोन-अडीच वर्षांत आमदार सावरकरांनी केलेल्या विकास कामांमुळेच भाजपच्या उमेदवारांच्या झोळीत भरभरून मते पडण्यास कारणीभूत ठरली. विशेष म्हणजे खारपाणपट्याचा भाग असलेली गावे आणि हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या गावातील मूलभूत सुविधांचा मास्टर प्लॅन तयार करण्यावर भर देत आमदार सावरकर यांनी शासनाकडे त्यासंदर्भात सातत्याने केलेला पाठपुरावा हेही भाजपसाठी जमेची बाजू ठरली. 

विधानसभेच्या गत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अकोला पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवीत हजारांपेक्षा अधिक मतं घेतली होती. ती आकडेवारी पाहता शिवसेनेचे उमेदवार अनेक प्रभागात मुसंडी मारतील, असे बोलले जात होते. मात्र, या मतदारसंघात शिवसेनेला प्रभाग क्रमांक चौदामध्ये मंगेश काळेच्या रूपाने एकमेव जागा मिळाली आहे. भारिपचे गठ्ठा मतदान असणाऱ्या या मतदारसंघाने हरिदास भदे यांना दोन वेळा आमदारकी दिली. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीत भारिप-बमसंला अवघ्या तीन जागा मिळाल्या. त्यामुळे अकोला पूर्व मतदारसंघातील भारिप बमसंचा प्रभाव ओसरल्याचे दिसून आले. महापालिका निवडणुकीत भाजपने मिळविलेले निर्विवाद वर्चस्व शिवसेना, भारिप बमसंच्या नेत्यांना मोठा धक्का देणाराच ठरला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख