कॉंग्रेसने केले भाजप आमदारांच्या घरासमोर घंटानांद  - Akola Congress Agitation | Politics Marathi News - Sarkarnama

कॉंग्रेसने केले भाजप आमदारांच्या घरासमोर घंटानांद 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 जून 2017

महापालिका प्रशासनाने केलेली करवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवार (ता.5) कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी भाजप आमदारांच्या घरासमोर घंटानांद आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतीबंधात्मक कारवाई केली. 

अकोला : महापालिका प्रशासनाने केलेली करवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवार (ता.5) कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी भाजप आमदारांच्या घरासमोर घंटानांद आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतीबंधात्मक कारवाई केली. 

अकोला महापालिकेने केलेल्या करवाढीचा मुद्दा पेटला आहे. या करवाढीला विरोधी पक्ष कॉंग्रेस, शिवसेना, भारिप बमसं, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तीव्र विरोध करीत सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यात येत आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोणतीही चर्चा न करता सत्ताधारी भाजपने करवाढीचा ठराव मंजुर केल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. करवाढीच्या मुद्यावर धरणे, निवेदन देऊन सत्ताधारी भाजपकडून कोणतीच सकारात्मक कारवाई होत नसल्याने कॉंग्रेसने आंदोलनाची धार तीव्र केली आहे. भाजपकडून अन्यायकारक करवाढ करून अकोलेकरांवर अन्याय करण्यात येत असल्याने याविरुद्ध कॉंग्रेसने आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. सोमवारी भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निवासस्थानी महापालिकेचे कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, प्रदेश महासचिव मदन भरगड, प्रकाश तायडे, राजेश भारती आदींनी घंटानांद आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. 

करवाढीचा मुद्या मुख्यमंत्र्यांच्या दरबारात 
करवाढीच्या मुद्यावर भारिप बमसंच्या गटनेत्या डॉ. धनश्री अभ्यंकर यांनी तीव्र विरोध करीत महाराष्ट्र दिनी करवाढीविषयी जनमत घेण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबविले. अकोलेकरांवर लादण्यात येत असलेल्या करवाढीच्या मुद्यावर धनश्री अभ्यंकर यांनी बुधवार (ता. सात) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी भेटीची वेळ मागीतली आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा अभ्यंकर यांनी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख