akola-congress | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

आयात पदाधिकाऱ्यांमुळे अकोला ग्रामीण काँग्रेसच्या संघटन बांधणीवर प्रश्‍नचिन्ह

मनोज भिवगडे
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत शहरातील पदाधिकाऱ्यांचा भरणा आहे. पूर्वीच्या महानगर कार्याकारिणीत पदाधिकारी असलेले आणि महापालिकेची निवडणूक लढविणाऱ्या तब्बल २५ जणांचा समावेश ग्रामीणच्या कार्यकारिणीत करण्यात आला आहे. काँग्रेसच्या ग्रामीण कार्यकारिणीला शहरातून पदाधिकारी आयात करावे लागले असल्याने पक्ष संघटन बांधणीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

अकोला : काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीत शहरातील पदाधिकाऱ्यांचा भरणा आहे. पूर्वीच्या महानगर कार्याकारिणीत पदाधिकारी असलेले आणि महापालिकेची निवडणूक लढविणाऱ्या तब्बल २५ जणांचा समावेश ग्रामीणच्या कार्यकारिणीत करण्यात आला आहे. काँग्रेसच्या ग्रामीण कार्यकारिणीला शहरातून पदाधिकारी आयात करावे लागले असल्याने पक्ष संघटन बांधणीवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
काँग्रेस जिल्हा कमिटीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या नेतृत्वात घोषित करण्यात आलेल्या ग्रामीणच्या कार्यकारणीमध्ये मोठ्या प्रमाणावर शहरातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी वर्ष-दीड वर्षापूर्वी महापालिकेची निवडणूक लढवली होती. काही पदाधिकारी हे महानगर कार्यकारणीमध्ये ही सहभागी होते. असे असतानाही त्यांना ग्रामीणच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आल्याने काँग्रेसच्या एकूणच पक्ष संघटना बांधणीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. 

आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता घोषित करण्यात आलेल्या या कार्यकारणीमध्ये सर्वांनाच सहभागी करून घेत, कोणाचीही नाराज होऊ नये असा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी वाशीम जिल्ह्यातील माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे चिरंजिव नकुल देशमुख यांचे नाव काँग्रेसकडून चर्चेत आहे. त्यासोबतच काँग्रेस आघाडीची ही जागा मिळावी म्हणून डॉक्टर अभय पाटील आणि प्रशांत गावंडे हेसुद्धा प्रयत्नशिल आहेत. भाजप सोडून नुकतेच काँग्रेसवाशी झालेले काटोलचे माजी आमदार आशीष देशमुख यांच्याकडूनही लोकसभेसाठी अकोला मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बरेच वर्षांपासून रखडलेली अकोला जिल्हा ग्रामीण कार्यकारणी घोषित करून कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. 

आशीष देशमुख कार्यकर्त्यांच्या संपर्कात 
काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आशीष देशमुख यांनी भाजपच्या कार्यशैलीला कंटाळून आमदारपदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये परतल्यानंतर त्यांच्यासाठी सोयीचा मतदारसंघ म्हणून अकोला लोकसभा मतदारसंघाकडे बघितले जाऊ लागले. अकोला लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संपर्क वाढवला आहे. त्यासाठी त्यांनी या मतदारसंघातील बुथ प्रमुखांची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. दिवाळी शुभेच्छा देण्याचे निमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांचा संपर्क वाढविण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.

स्थानिक नेत्यांच्या भुवया उंचावल्या 
आशीष देशमुख यांनी अकोला लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवल्याने स्थानिक नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनंतराव देशमुख यांचा मुलगा नकुल देशमुख यांना अकोला लोकसभा मतदारसंघासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी शक्यता असताना आशीष देशमुख यांचे नाव पुढे आले आहे. त्यांनी येथील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविल्याने स्थानिक नेत्यांना आपला पत्ता कट होण्याची भीती वाटू लागली आहे.

आशीष देशमुख यांचे विदर्भात राहणार वर्चस्व 
विदर्भात लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या जागा वाटप करताना आशीष देशमुख यांचा वरचष्मा राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या समक्ष प्रवेश घेतल्यानंतर विदर्भातील सर्वच लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान त्यांनी भाजपाविरोधात आघाडी उघडल्याने  काँग्रेसने त्यांच्यावर विदर्भात मोठी जबाबदारी टाकल्यास नवल वाटू नये.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख